नवजात बालकाला कोरोनाची लागण, झुंज अपयशी

लहान बालकांसाठी पालघर जिल्ह्यात आरोग्य सुविधा नसल्याने कोरोनाची लागण झालेल्या आणि उपचारासाठी वणवण फिरलेल्या पालघरमधील नवजात बाळाचा नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान करूण अंत झाला. गेले सहा दिवस हे बाळ मारणाशी झुंज देत होते. मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली आहे. सकाळी पाचच्या सुमारास या नवजात बालकाचा मृत्यू झाला

पालघर तालुक्यातील सफाळे दारशेत येथील राहणाऱ्या आदिवासी समाजाची अश्विनी काटेला यांनी सहा दिवसांपूर्वी पालघर शहरातील एका खाजगी दवाखान्यात नवजात बाळाला जन्म दिला. मुदतपूर्व प्रसूती झाल्याने बाळाचे वजन कमी होते म्हणून त्याला पालघरच्या एका दुसऱ्या दवाखान्यात उपचारासाठी हलविले गेले. तेथे बाळाची अँटीजन टेस्ट केल्यानंतर बाळ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. मात्र मातेची टेस्ट निगेटिव्ह आली होती.

बाळाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला पालघर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथे बालकांसाठी सुविधा नसल्याने तसेच करोना लागण झालेल्या बालकांसाठी जिल्हा प्रशासनाने कोणतीही आरोग्य सुविधा उभारली नसल्याने बाळाला उपचारासाठी पालकांना प्रचंड पायपीट करावी लागली. उपचारासाठी अनेक तास वाट बघितल्यानंतर बालकाला जव्हार येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले.

मात्र बाळाची प्रकृती खालावल्याने आणि जव्हार रुग्णालयात उपचार पद्धती उपलब्ध नसल्याने बाळाला दोन दिवसानंतर जव्हार येथून नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अखेर आज पहाटे 5 च्या दरम्यान बाळाने शेवटचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. या नवजात बाळाला 6 दिवसांच्या जीवन मरणाच्या झुंजात उपचारअभावी अखेर हार पत्कारावी लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.