आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपानं कंबर कसली आहे. या निवणुकीच्या तयारीचा भाग म्हणून भाजपाच्या समन्वय समितीची पहिली बैठक आज (रविवार) होणार आहे. ANI नं दिलेल्या वृत्तानुसार भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठीची रणनीती निश्चित केली जाणार आहे. भाजपानं मित्रपक्ष आणि प्रदेश कार्यकारणीच्या चर्चेसाठी 14 सदस्यांची समन्वय समितीचीची स्थापना केली आहे. आज होणाऱ्या पहिल्या बैठकीत सदस्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल असे मानले जात आहे.
राष्ट्रपती निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी इतर राजकीय पक्षांशी चर्चा करण्यासाठी भाजपानं पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि राजनाथ सिंह यांना जबाबदारी सोपवली आहे. त्याचबरोबर केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना निवडणूक नियमन समितीचे संयोजक म्हणून नियुक्त केले आहे. भाजपा सरचिटणीस विनोद तावडे आणि सीटी रवी या समितीचे सहसंयोजक आहेत. त्याचबरोबर या टीममध्ये केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, अश्विनी वैष्णव, सर्बानंद सोनोवाल, संसदीय कार्य राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल, आरोग्य राज्य मंत्री भारती पवार, राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग, राष्ट्रीय उपाध्यक्ष डीके अरुणा और राष्ट्रीय सचिव ऋतुराज सिन्हा या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
रविवारी होणाऱ्या बैठकीत समितीमधील सदस्यांची भूमिका आणि जबाबदारीवर चर्चा होईल. एएनआयला जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 14 सदस्यांना वेगवेगळ्या राज्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. हे सदस्य त्या राज्याचा दौरा करून तिथं समन्वयाचं काम करतील.
विरोधी पक्षानं राष्ट्रपती निवडणुकीत संयुक्त उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात अद्याप हा उमेदवार निश्चित झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनीही जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा दाखला देत माघार घेतलीय. आता विरोधी पक्षांकडून पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाल कृष्ण गांधी यांच्या नावाची चर्चा आहे.