शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन
शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन सोहळा आहे. आधी हा सोहळा ऑनलाइन होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, हा सोहळा आता मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तिथेच राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहे.
शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता शिवसैनिकांना मार्गदर्शन भाषण करणार आहे.हा सोहळा पवई येथील वेस्टिन हाँटेलच्या सभागृहात मर्यादीत स्वरुपात साजरा होणार आहे.
गेले दोन वर्ष कोविड १९ संसर्गामुळे शिवसेनेचा वर्धापन सालाबादप्रमाणे जल्लोषात साजरा करता आला नव्हता. मात्र यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा करण्याचं नियोजन शिवसेनेकडून करण्यात आलं होतं. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा कोविड 19 संसर्गबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे याही वर्षी शिवसेनेचा वर्धापन दिन मर्यादीत स्वरुपातच साजरा करण्यात येत आहे.
येत्या २० जून रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी शिवसेनेनं त्यांचे सर्व आमदार पवई येथील वेस्टिन हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवलेत. याच हॉटेलमधील सभागृहात आज शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार आणि काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील शिवसैनिकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन करणार भाषण ऑनलाइनद्वारे पाहता आणि ऐकता येणार आहे.
गेली अडीच वर्षे राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. पण सत्ताधारी शिवसेनेला विरोधी पक्ष भाजपने वेगवेगळ्या मार्गांनी घेरलंय. राज्यसभा निवडणुकीतला दगाफटका झाला आणि उद्या होणारी विधान परिषद निवडणूक तसेच संभाव्य प्रलंबित महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची खरी परिक्षा असणार आहे. त्यासाठी शिवसैनिकांचं मनोबल उंचावण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.