महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळावरील विविध पॉइंटस आणि प्रेक्षणीय स्थळांवर फिरायला जाण्यासाठी यापुढे विद्युत ऊर्जेवरील वाहने आवश्यक असणार आहेत. या स्वरूपाचा प्रस्ताव या दोन्ही पालिकांनी तयार करून तो अंतिम मंजुरीसाठी पर्यटन मंत्रालयात पाठवला आहे.
महाबळेश्वर, पाचगणी येथे रोज येणाऱ्या इंधनावरील शेकडो वाहनांमुळे येथे वाहतूक कोंडी तर होतेच शिवाय यामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणामुळे येथील निसर्गालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
याचाच विचार करत महाबळेश्वर, पाचगणी या दोन्हीही नगरपालिकांच्या वतीने या पर्यटनस्थळी आल्यानंतर स्थानिक पर्यटनासाठी केवळ विद्युत वाहनांना परवानगी देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
या प्रस्तावानुसार येथे पर्यटक आपली पेट्रोल-डिझेलवरील वाहनांनी महाबळेश्वर, पाचगणीमध्ये येऊ शकतील. मात्र ही वाहने त्यांना येथेच वाहनतळावर लावावी लागतील.
महाबळेश्वर, पाचगणी या निसर्गरम्य स्थळांच्या पर्यावरण संरक्षणासाठी हा प्रस्ताव तयार केला आहे. येथे फिरण्यासाठी पर्यटक किंवा असे व्यवसाय करणाऱ्यांकडे विद्युत ऊर्जेवर चालणारे वाहन आवश्यक असणार आहे. हा प्रस्ताव पर्यटन विभागाकडे सादर करण्यात आला आहे.