पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
कागदाचे तुकडे, पाण्याची ब़ॉटल उचलली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगती मैदान इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाचा मुख्य बोगदा आणि पाच अंडरपासचे उद्घाटन केले. या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे. पंतप्रधानांनी प्रगती मैदान इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाच्या मुख्य बोगद्याचे आणि पाच अंडरपासचे उद्घाटन केले.या उद्घाटनानंतर एक किस्सा घडला. मोदी कॉरिडॉरची पाहणी करताना एक अनोखं दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले. मोदी यांनी यांनी कागदाचे तुकडे आणि पाण्याची ब़ॉटल उचलली. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. मोदींच्या या कृतीची सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
ना कोरोना ना मंकीपॉक्स, नायजेरियात पसरली ‘लासा’ची साथ, आतापर्यंत 155 जणांचा मृत्यू
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाला जगाला वेठीस धरले आहे. जग कोरोनातून सावरतंय ना सावरतंय, तोच मंकीपॉक्स येऊन धडकला. आता याच दरम्यान नायजेरियामध्ये एक नवं संकट येऊन धडकलं आहे. नायजेरिया ‘लासा’ या तापाशी झुंज देत आहे. देशात या तापामुळे मृतांची संख्या 155 वर पोहोचली आहे. नायजेरिया सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने ही माहिती दिली. नायजेरियाच्या सार्वजनिक आरोग्य एजन्सीने सांगितले की, या वर्षाच्या सुरुवातीपासून या आजाराची 4,939 संशयित प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी 782 प्रकरणांमध्ये लासाचं निदान झाल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली आहे.
अग्निपथ योजनेमागे BJP-RSS चा गुप्त अजेंडा; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
केंद्र सरकारच्या नवीन अग्निपथ योजनेबाबत देशात मोठा गदारोळ झाला आहे. देशातील अनेक राज्यात याविरोधात आंदोलने सुरू आहेत. काही ठिकाणी याला हिंसक वळण लागले असून रेल्वे, बसेस जाळण्यात आल्या आहेत. विरोधी पक्षांकडूनही याला कडाडून विरोध होत आहे. यात आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अग्निपथ योजनेवरुन भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला लक्ष्य केलं आहे. अग्निवीर या योजनेमागे भाजप आणि आरएसएसचा गुप्त अजेंडा असल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
अहमदनगर हादरलं! पाच वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार, पीडितेला जीवे मारण्याचा प्रयत्न
अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुरी तालुक्यातील एका गावात पाच वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार केला आहे. आरोपी अत्याचार करुन थांबला नाही तर त्याने पीडितेला जीवे मारण्याचादेखील प्रयत्न केला. सुदैवाने चिमुकलीची आई घटनास्थळी धावत आल्याने पीडितेचा जीव वाचला. संबंधित घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर अशाप्रकारचं किळसवाणं आणि संतापजनक कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा द्या, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. या घटनेमुळे पीडितेच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
शनिशिंगणापूरमध्ये चौथऱ्यावर महिलांना
तैलाभिषेक करण्याची परवानगी
शनिशिंगणापूरमध्ये चौथऱ्यावर महिलांना तैलाभिषेक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हा चौथरा आता सर्वांसाठीच खुला करण्यात आला आहे. पूर्वी सर्व भाविकांना चौथऱ्यावर जाऊन तैलाभिषेक करता येत होता. मात्र, काही वर्षे या ठिकाणी महिलांना प्रवेश बंद करण्यात आला होता. 2015 मध्ये भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळावा या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी भाविकांना केवळ पादुकांपर्यंत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता.
घराच्या छताला बांधलेला साडीचा झोका तुटल्याने दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घराच्या छताला बांधलेला साडीचा झोका तुटल्याने दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना ही एरंडोल तालुक्यातील सावदे प्र.चा. येथे घडली आहे. घराच्या छताला बांधलेल्या साडीच्या झोक्यात तीनही बहिणी खेळत होत्या. खेळता-खेळता अचानक हा झोका तुटला. यात तिघी बहिणींपैकी एकीचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाल्या आहेत. अर्चना धनसिंग पावरा असं दीड वर्षाच्या मृतक बालिकेचं नाव आहे.
विधानपरिषद निवडणुकीची अजिबात
चिंता वाटत नाही : उद्धव ठाकरे
सोमवारी २० जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या चारही पक्षांनी उद्याच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यात शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतल्या वेस्टइन हॉटेलमध्ये पाचारण केलं आहे. या सर्व आमदारांशी आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी आमदारांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद निवडणुकीची अजिबात चिंता वाटत नसल्याचं सांगितलं. तसेच, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या नेत्यांचा उल्लेख करत कौतुक देखील केलं
स्पाइस जेट च्या विमानाला लागली
आग, 185 प्रवासी बचावले
स्पाईसजेट या विमान वाहतुक कंपनीच्या एका विमानाला अचानक आग लागल्यामुळे त्याचं बिहार राज्यातील पटणा येथील बिहता विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. या विमानात एकूण १८५ प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवासी विमानातून सुखरुप बाहेर आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र स्पाईसजेटच्या बोईंग ७२७ विमानाला अचानकपणे आग लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे
आसाममधील पूरस्थिती गंभीर
५५ जण मृत्युमुखी
अखंड कोसळणाऱ्या पावसामुळे आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. राज्यात २८ जिल्ह्यांतील तब्बल १९ लाख नागरिकांना या महापुराचा फटका बसला आहे. होजाई जिल्ह्यात पूरग्रस्तांना घेऊन जाणारी नाव उलटली असून, तीन मुले बेपत्ता झाली आहेत, तर २१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. राज्यात आतापर्यंत दरड कोसळून व पुरामुळे ५५ जण मृत्युमुखी पडले आहेत.
अग्निपथ योजनेच्या विरोधात
काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन
अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. या योजनेच्या विरोधात देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले असून अनेक शहरांमध्ये हिंसाचाराच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान, या योजनेच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने आज दिल्लीत जंतरमंतरवर सत्याग्रह करण्यात येत आहे. या ‘सत्याग्रहा’मध्ये काँग्रेसचे खासदार, त्यांच्या कार्यकारिणीचे सदस्य, भारतीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
राज ठाकरेंवर आज शस्त्रक्रिया;
कार्यकर्त्यांकडून महाआरतीचे आयोजन
राज ठाकरेंसाठी मनसैनिकांकडून महाआरती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज हीप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबईत महाआरती आणि पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मनसेच्या महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेतर्फे गणेश मंदिर आणि हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजनही करण्यात आले आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. आज लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. चाचण्या करणासाठी राज ठाकरेंना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाचव्या सामन्यात पावसामुळे
व्यत्यय येण्याची शक्यता
भारत-दक्षिण आफ्रिकेतील पाच T20 सामन्यातील पाचवा टी20 सामना आज एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेत आतापर्यंत दोन्ही संघाने 2-2 ने आघाडी घेतली आहे. आजचा पाचवा सामना हा निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात विजय मिळवून कोणता संघ मालिका खिशात घालतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये आज पावसाची शक्यता आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे रणजी ट्रॉफीच्या सामन्यांवरही परिणाम झाला होता. आता पाचव्या टी20वरही पावसाचे सावट आहे.
SD social media
9850 60 3590