मुंबईतील पहिल्या ‘सेफ स्कूल झोन’चा प्रयोग यशस्वी

मुंबईतील पहिल्या सेल्फ स्कूल झोनचा सर्व्हे जारी करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईतील भायखळ्यातील ख्राइस्ट चर्च शाळेतील 93% विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेसमोरील रस्त्यावरून त्यांना आता अधिक मोकळेपणे वापरता येत असल्याचं स्पष्ट केलं. पादचाऱ्यांच्या क्रॉसिंगच्या जागी सामान्य झेब्रा क्रॉसिंगच्या आधी 9.8% वाहनचालक वाहनाचा वेग कमी करतात. त्या तुलनेने शाळेच्या बाहेरील लक्षवेधी झेब्रा क्रॉसिंगच्या आधी 41% वाहनचालकांनी वाहनांचा वेग कमी केला असल्याचं या सर्व्हेतून दिसून आलं आहे.

शाळेबाहेर सेफ स्कूल झोन तयार करण्यात आला. त्या रस्त्याचा वापर करणाऱ्यांचे, विशेषतः मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस यांनी वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय), इंडिया रॉस सेंटर यांच्यासह ग्लोबल रोड सेफ्टीसाठी (जागतिक पातळीवर रस्ते सुरक्षा) ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीजअंतर्गत सेफ स्कूल झोन प्रायोगिक तत्वावर सुरू केला. मुंबईत बालकस्नेही आणि चालण्यासाठी सुयोग्य शालेय झोन तयार करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

भायखळा येथील ख्राइस्ट चर्च शाळेसमोरील मिर्झा गालिब रोड किंवा क्लेअर रोडवर या प्रकल्पाची पहिली चाचणी करण्यात आली. हा रस्ता सर्व वापरकर्त्यांसाठी विशेषतः मुलांसाठी चालण्यासाठी सुयोग्य, सुरक्षित आणि चैतन्यदायी करण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आले होते. या प्रयत्नांचा भाग म्हणून कोन्स, बॅरिकेड्स, प्लँटर्स, खडू आणि पेंटचा वापर करून शाळेचा झोन निश्चित करण्यात आला. तसेच वाहतुकीला दिशा देण्यात आली. तिची रहदारी व वेगाचे नियमन करण्यात आले. रस्त्यावरील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि चालण्यासाठी व रस्ता ओलांडण्याआधी थांबण्यासाठी जागा निश्चित केली गेली.

लोकांसाठी, विशेषतः मुलांसाठी सुरक्षित रस्त्यांची रचना केल्याने रस्ते सगळ्यांसाठीच सुरक्षित होतील. मुंबईतील सेफ स्कूल झोन प्रयोग हा भारतातील सर्व शहरांसाठी बालक-स्नेही रस्त्यांची रचना निर्माण करण्यासाठी आदर्श प्रारुप असेल, असं समाजवादी पक्षाचे भायखळ्याचे नगरसेवक आणि आमदार रईस शेख यांनी सांगितलं.

या प्रयोगाच्या परिणामाचे मूल्यमापन करण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आले की, या प्रयोगामध्ये जवळपास 100% मुलांना रस्ते सुरक्षित आढळून आले. या प्रयोगाच्या आधी व नंतर 40 मुले, 40 पादचारी, 20 व्यावसायिक आणि 20 वाहनचालकांची मुलाखत घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.