देशातील ११ राज्यांमध्ये डेंग्यूचे
धोकादायक प्रकार आढळले
देशातील ११ राज्यांमध्ये डेंग्यूचे धोकादायक प्रकार नोंदवण्यात आले आहे. या ११ राज्यांना केंद्राने डेंग्यूच्या प्रकरणांचा लवकर शोध घेण्यासाठी, ताप हेल्पलाईन सुरू करण्यासाठी आणि पुरेशा टेस्टिंग किट, डासांवर फवारणीच्या औषधांसह आणि उपचारासाठी औषधे साठवण्याचे आदेश दिले आहेत. करोना परिस्थितीच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत आगामी काळात सण-उत्सावांच्या पार्श्वभूमीवर राज्यांना गर्दी आणि मेळावे टाळण्याचे निर्देश दिले.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…!
‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’, असं म्हणत लाडक्या गणरायाला भक्तीभावाने आज निरोप दिला जात आहे. गेली दहा दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणरायाला निरोप देताना गणेशभक्तांचा कंठ दाटून येतोय. लहान चिमुरड्यांना गणपती विसर्जनाच्या वेळी रडू कोसळले.
देशभरासह राज्यात ठिकठिकाणी लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सार्वजनिक गणेश मंडळांना मोठ मोठ्याला मिरवणुकीला मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी शांततेत आणि कमी लोकांच्या गर्दीत गणरायाचं विसर्जन होतं आहे. देशभरात आज सकाळपासून ठिकठिकाणी लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे.
बॉम्बस्फोटाचा कट रचणार्या
एका संशयिताला अटक
देशाला हादरवून टाकण्याचं मोठे षड्यंत्र भारतीय यंत्रणांनी उधळून लावलं आहे. तर पुन्हा एकदा मुंबई एटीएसने धडक कारवाई केली आहे. आता मुंबई एटीएसच्या पथकाने मुंब्रा परिसरातून बॉम्बस्फोटांचा कट रचल्याच्या आणखी एका आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव इम्रान उर्फ मुन्ना भाई असं असल्याची माहिती मिळतेय.
पक्षश्रेष्ठींना माझ्यावर संशय
मला अपमानित झाल्यासारखं वाटतंय
पक्षश्रेष्ठींना माझ्यावर संशय आहे की मी सरकार चालवू शकलो नाही. मला अपमानित झाल्यासारखं वाटतंय, असं म्हणत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा आज राजीनामा दिला. त्यानंतर पक्षश्रेष्ठींबद्दलची आपली नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे. राजीनामा देण्याआधी आपण काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संपर्कात होतो, त्यांनी आपली माफी मागितली, असा दावा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केला होता. तसंच आता आपली नाराजी पत्राद्वारे पक्षाध्यक्षांना कळवलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी
सुखजिंदर सिंग रंधावा
पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेस हायकमांडकडून या संदर्भात लवकरच अंतिम निर्णय होणं अपेक्षित आहे. तसेच अरुणा चौधरी आणि भारत भूषण आशु हे पंजाबचे पुढील उपमुख्यमंत्री असतील. तर, अरुणा चौधरी या दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतील असं सूत्रांनी सांगितलंय. राहुल गांधी आणि अंबिका सोनी विधानसभेतील काँग्रेस नेते आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करत असल्याची माहिती मिळत आहे. अंबिका सोनी यांनी शनिवारी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली होती.
अकृषी विद्यापीठात
NCC Studies ला मान्यता
विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी आता राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठात व सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये ‘NCC Studies’ हा विषय वैकल्पिक विषय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत ज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.
वाई तालुक्यातील सोमनाथ मांढरे
या जवानाला वीर मरण
सोमनाथ मांढरे हे वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र आहेत. त्यांची लडाख येथे नेमणूक करण्यात आली होती. यावेळी हवामानातील बदलामुळे पहाटेपासूनच त्यांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच ते बेशुद्ध झाले. त्यांना लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती सायंकाळी कुटुंबियांना देण्यात आली. देश सेवा करत असताना अतिशय प्रतिकूल वातावरणाचा सामना करत असताना त्यांना हे वीरमरण आले.
खंडणी सरकारच्या दडपशाहीचा
हिशोब जनता चुकता करणार
पुण्यात मानाचा चौथा गणपती असणाऱ्या तुळशीबाग गणपतीचं ढोल-ताशा वादन सुरू असताना पोलिसांनी वादन करू नये यासाठी त्यांच्याजवळील साहित्य काढून घेतलं होतं. या घटनेवरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणे बाकी ठेवले आहे. पुणे पोलिसांनी मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक थांबवून ढोल-ताशे जप्त केले आहेत. खंडणी सरकारच्या या दडपशाहीचा हिशोब चुकता केल्याशिवाय जनता रहाणार नाही.” असं अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं आहे.
पाकिस्तानाला मोठी किंमत
चुकवावी लागली : इमरान खान
पाकिस्तानने अफगाणिस्तान संदर्भात अमेरिकेची बाजू घेतल्याची खूप मोठी किंमत मोजावी लागली, असं पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलंय. अफगाणिस्तानमधील पाकिस्तानच्या भूमिकेबाबत अमेरिकन खासदारांनी सातत्याने टीका केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हे वक्तव्य केलंय. इम्रान खान यांनी अफगाणिस्तानात अमेरिकेच्या अपयशासाठी पाकिस्तानकडे बोट दाखवणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या अपयशासाठी पाकिस्तानकडे विनाकारण बोट दाखवले जात असल्याचं खान यांनी म्हटलंय.
विराट कोहलीच्या विरोधात
ज्येष्ठ क्रिकेटपटूची तक्रार
भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आणि यानंतर कर्णधार विराट कोहली म्हणाला, ”खेळाडूंमध्ये तो जिंकण्यासाठीचा हेतू आणि आत्मा नव्हता.” काही खेळाडू विराटच्या वक्तव्यावर खूश नव्हते. स्पोर्ट्सकीडा आणि एनडीटीव्ही यांच्या वृत्तानुसार एका वरिष्ठ क्रिकेटपटूने याबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे तक्रार केली होती.
SD social media
9850 60 3590