आज दि.१८ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

आज सुसंवाद पाहायला मिळत नाही,
आता कोथळा काढायची भाषा : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज मृणालताई गोरे दालनाचे उद्घाटन झाले. या वेळी शरद पवार म्हणाले, मृणालताई गोरे सदनात असताना अनेकदा वाद व्हायचे पण ते राज्याच्या हिताचे असायचे. सुसंवाद पाहायला मिळायचा, तो सुसंवाद आज पाहायला मिळत नाही. आता कोथळा काढायची भाषा केली जाते.” असं देखील पवारांनी बोलून दाखवलं.

काँग्रेस हायकमांडने अमरिंदर सिंग यांच्या
राजीनाम्याचे दिले आदेश

पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढत चालला आहे. या सर्व गोंधळात आता पक्षाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस हायकमांडने माहिती मिळताच अमरिंदर सिंग यांनी आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि खासदार मनीष तिवारी यांच्याशी चर्चा केली आहे. दरम्यान, अमरिंदर सिंग यांनी आधी जर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवले गेले तर ते पक्षही सोडतील असेही सांगितले होते.

कारणं सांगू नका, जरा माझ्या
गतीने कामे करा : अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडकपणे बोलण्याच्या शैलीसाठी ओळखले जातात. असाच काहीसा प्रकार शनिवारी बारामतीमध्ये पाहायला मिळाला. बारामतीमधल्या नियोजित कार्यक्रमांना अजित पवारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमावेळी त्यांनी खरेदी विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांना अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना सूचना देताना फटकारले आहे. तुम्ही मला कसलीही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा, असं अजित पवार पदाधिकाऱ्यासह अधिकाऱ्यांना म्हणाले.

बाबुल सुप्रियो यांचा
तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी खासदार बाबुल सुप्रियो यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर सुप्रियो यांनी अलीकडेच भाजपा सोडल्याचे जाहीर केले होते. त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणाही केली होती. तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूलचे सदस्यत्व दिले आहे.

शिर्डी साईबाबा संस्थानच्या
अध्यक्षपदावर काळे यांची निवड

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाची राज्य सरकारकडून रात्री उशिरा घोषणा झाली. यानुसार आमदार आशुतोष काळे यांची संस्थानच्या अध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे. दरम्यान, अध्यक्ष काळे यांच्यासह अकरा सदस्यांनी शुक्रवारी शिर्डीत येत पदभार स्वीकारला.

अभिनेता सोनू सूदने २० कोटी
रुपयांपेक्षा अधिक कर चुकवला

अभिनेता सोनू सूदने २० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर चुकवला आहे, असं आयकर विभागानं आज एका निवेदनात म्हटलंय. आयकर विभागाने सलग तीन दिवस त्याच्या मुंबईच्या घरी जाऊन यासंदर्भात शोध घेतला होता. सोनूने परदेशी देणगीदारांकडून क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून २.१ कोटी रुपये गोळा केले असून परदेशी योगदान कायद्याचे उल्लंघन केले आहे, असंही आयकर विभागाकडून सांगण्यात आलंय.

बंगळुरमध्ये एकाच कुटुंबातल्या
पाच जणांची आत्महत्या

बंगळुरमध्ये एकाच कुटुंबातल्या पाच जणांनी आत्महत्या केल्याचं उघड झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी घरातल्या एका ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा भुकेनं तडफडून मृत्यू झाल्याचा प्रकार पोलिसांना निदर्शनास आला असून एक अडीच वर्षांची मुलगी वाचली आहे. घरातीलच एक सदस्य काही दिवसांनी बाहेरगावाहून घरी परतल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊ या प्रकरणाचा तपशील घेतला असून त्याविषयी पुढील तपास सुरू केला आहे.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे
नरिमन पॉईंटपर्यंत नेण्याचा विचार

सरकार जगातील सर्वात लांब महामार्ग म्हणजेच दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे बांधत आहे”, असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री यांनी जाहीर केलं आहे. एका कार्यक्रमात ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले की, “एक्स्प्रेस वे १ हजार ३८० किमी लांबीचा असेल आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) पर्यंत जाईल. परंतु, आता आम्ही तो नरिमन पॉईंटपर्यंत नेण्याचा देखील विचार करत आहोत.” गडकरी यांच्या मते, हा प्रकल्प मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होईल.

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी
अनिल कुंबळेचे नाव पुन्हा चर्चेत

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-20 विश्वचषकानंतर समाप्त होणार आहे. टी-20 विश्वचषकास ऑक्टोबरमध्ये सुरूवात होणार असून, १४ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. म्हणजे पुढील दोन महिन्यानंतर रवी शास्त्री हे भारतीय संघाचे प्रशिक्षक असणार नाहीत. तर, रवी शास्त्री नंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी आता अनिल कुंबळे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. बीसीसीआय आता पुन्हा एकदा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेना परत आणण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.