निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसाठी स्वायत्त यंत्रणा असावी, या मागणीसाठी दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. न्या. के. एम. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने २४ नोव्हेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता.निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या ‘न्यायवृंद’सारखी (कॉलेजियम) यंत्रणा असावी का, यावर याचिकाकर्ते आणि सरकारच्या वतीने न्या. अजय रस्तोगी,न्या. अनिरुद्ध बोस, न्या. हृषिकेश रॉय आणि न्या. सी. टी. रवीकुमार यांचा समावेश असलेल्या घटनापीठात जोरदार युक्तिवाद झाला. न्यायालयाच्या विषयसूचीनुसार न्या. जोसेफ आणि न्या. रस्तोगी हे दोन स्वतंत्र निकालांचे वाचन करतील. न्यायालयासमोर आलेल्या अनेक पर्यायांपैकी एक पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेता यांचा समावेश असलेल्या समितीमार्फत निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा पर्याय आहे. यासह अन्य पर्यायांवर न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
सर्वोच्च न्यायालय आज, दोन महत्त्वाच्या प्रकरणांवर निर्णय देणार आहे. एक म्हणजे, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत आणि दुसरे, भांडवली बाजारांसाठी नियामक प्रणाली अधिक कठोर करण्यासाठी समिती नेमण्याबाबत. विधानसभा पोटनिवडणुकांचा कौलही आज स्पष्ट होणार असल्याने आजचा दिवस निकालांचा आहे.