आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली.
आज सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला.
यंदा आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) या दाम्पत्याने महापूजा केली.
केशव कोलते 20 वर्षा पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. त्या सेवेचं त्यांना महापुजेच्या निमित्तांन फळ मिळाल्याचं म्हणावं लागेल.
दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली.
यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यंदा मानाचा वारकरी म्हणून विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांना मान मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोलते दाम्पत्याचा सत्कार केला गेला.