जगातील सुमारे 30 देशांमध्ये थैमान घालणाऱ्या मंकीपॉक्स विषाणूचं नाव बदलण्यात येणार आहे. खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती दिली आहे. जगभरातील शास्त्रज्ञांची मतं जाणून घेतल्यानंतर WHO ने हा निर्णय घेतला आहे.
जगभरातील तज्ज्ञ मंकीपॉक्स विषाणूचे नाव बदलण्याबाबत चर्चा करत आहेत. या नावाला जागतिक पातळीवर आक्षेप घेण्यात आला असून हे नाव भेदभाव दर्शवणारं असल्याचं सांगितलं जात आहे, डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी याबाबत माहिती दिली.
मंकीपॉक्स विषाणूचं नाव आणि त्यामुळे होणाऱ्या आजाराचे नाव बदलण्यासाठी तज्ज्ञांसोबत काम करत असल्याचं WHO ने म्हटलं आहे. वास्तविक, 30 आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या पत्रानंतर WHO ने हे पाऊल उचललं आहे. WHO लवकरच नवीन नावांची घोषणा करेल.
मंकीपॉक्स विषाणूचं नाव आफ्रिकेशी संबंधित
हे नाव तातडीने बदलण्याची गरज या पत्रात नमूद करण्यात आली आहे. या विषाणूचं नाव आफ्रिकेशी जोडलं जात आहे आणि हे भेदभाव आणि त्या देशाचं नकारात्मक चित्रण दर्शवणारं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
मंकिपॉक्स आजाराशी संबंधित व्यक्ती दाखवताना मीडिया आणि सोशल मीडियावर आफ्रिकन लोकांची चित्रं दाखवली जातात. फॉरेन प्रेस असोसिएशन ऑफ आफ्रिकेने एक निवेदन जारी करत जागतिक प्रसारमाध्यमांना साथीच्या रोगासाठी आफ्रिकन लोकांचे फोटो वापरणे थांबवण्याचे आवाहन केलं आहे. त्यामुळे या आजाराचं नाव असं ठेवावं की त्याचा कोणत्याही देशावर नकारात्मक परिणाम होणार नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचा फैलाव
जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स आजाराचा फैलाव झाला असून हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मंकीपॉक्सचा फैलाव हा चिंताजनक असल्याचं WHO ने म्हटलं आहे.