भारत, युगांडामध्ये Covishield लसीचे
बनावट डोस आढळले
जागतिक आरोग्य संघटनेनं एका गंभीर गोष्टीकडे जगाचं आणि विशेषत: भारताचं लक्ष वेधलं आहे. भारत आणि युगांडामध्ये Covishield लसीचे बनावट डोस आढळल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द सिरम इन्स्टिट्युटनं याला दुजोरा दिला आहे. लसीकरणामुळे करोनाची भिती काहीशी कमी होत असताना बनावट लसीमुळे ही भिती पुन्हा डोकं वर काढू लागली आहे.
तालिबानला खुलं आव्हान
देणाऱ्या महिला नेत्या कैदेत
तालिबानविरोधात हातात शस्त्र घेणाऱ्या महिला नेत्या सलीमा माझरी यांना ताब्यात घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. जेव्हा बहुतांश अफगाणी नेत्यांनी देशातून पळ काढला त्यावेळी बल्ख परिसरात सलीमा तालिबानशी लढण्यासाठी खंबीरपणे उभ्या होत्या. जोपर्यंत त्यांचा जिल्हा चारकिंत तालिबान्यांच्या ताब्यात जात नाही, तोवर त्या लढत होत्या.
अनिल देशमुखांवर अटकेची
टांगती तलवार कायम
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्यांना दिलासा मिळालेला नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयचा एफआयआर रद्द करण्यास नकार देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. तर, अटकेची टांगती तलवार अनिल देशमुखांवर कायम आहे.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या
इतिहासामुळे महाराष्ट्रात दंगली!
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर टीका केली आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या इतिहासामुळे महाराष्ट्रात दंगली घडल्या असा आरोप आखरे यांनी केलाय. तसेच राज ठाकरेंनी वाटेल ते बोलून महाराष्ट्राला वेठीस धरु नये असं आवाहनही आखरे यांनी केलं आहे.
एनडीएच्या प्रवेश परीक्षेला
महिलांना बसण्याची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन निर्णयानंतर महिलांना देखील राष्ट्रीय सुरक्षा अकादमीची परीक्षा देता येणार आहे. न्यायालयाने बुधवारी यासंदर्भात एक आदेश दिला आहे. त्यानुसार महिलांना ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या एनडीएच्या प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने एनडीए आणि नेव्हल अकॅडमी परीक्षेसाठी महिला उमेदवारांना परवानगी न देण्याच्या केंद्राच्या धोरणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला.
देशात कोरोनाग्रस्तांमध्ये
10 हजारांनी वाढ
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 10 हजारांनी वाढ झाली. कालच्या दिवसात 35 हजार 178 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 440 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या सध्या चार लाखांच्या खालीच आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा आहे.
कोरोनाकाळात लसी दुसऱ्या
देशांना पाठवणं हे हत्याकांडच : काँग्रेस
कोरोनामध्ये ज्यांचे मृत्यू झाले त्यांची जाहीर माफी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागावी. लसी दुसऱ्या देशांना पाठवून भाजपने कोरोना काळात हत्याकांड घडविले, त्यांनी हे पाप केलं, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. कोरोना काळात एका एका कुटुंबातील अनेक लोकांचे जीव गेले. आर्थिक कमजोर झाले. यामुळे पंतप्रधांनी देशाची जाहीर मागावी ,अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
तुळजाभवानीचे मंदिर सुरू
करण्यासाठी लाक्षणिक उपोषण
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर सुरू करण्यासाठी तुळजापूर येथील पुजारी व व्यापारी आक्रमक झाले आहे. मंदिर सुरू व्हावे म्हणून व्यापारी आणि पुजाऱ्यांनी मंदिरासमोर लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. ‘दार उघड बये आता दार उघड’, ‘आई राजा उदो उदो’ अशी घोषणाबाजी करत पुजारी-व्यापाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली.
SD social media
9850 60 3590