गेहलोत यांच्या अप्रत्यक्ष बंडामुळे गांधी कुटुंबाला धक्का ; खरगे-माकन माघारी, आता कमलनाथ मध्यस्थी करण्याची शक्यता

राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी जयपूरला गेलेले सोनिया गांधी यांचे दोन्ही दूत कामगिरी फत्ते न करताच सोमवारी दिल्लीत परतल्याने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस नेतृत्वाविरोधात अप्रत्यक्ष ‘बंड’ केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गांधी घराणे पहिल्यांदाच अडचणीत आले असून, त्यांची पक्षावरील पकड सैलावल्याचे मानले जाते.

काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांना सोनिया आणि राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, दोन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे झालेल्या सविस्तर चर्चेमध्ये गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यास कडाडून विरोध केला. ‘सचिन पायलट यांनी माझे सरकार पाडण्याचा कट रचला होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री होऊ देणार नाही’, असेही गेहलोत यांनी गांधी कुटुंबातील सदस्यांना सांगितले होते. पण, ‘सचिन पायलट यांना मिळालेली शिक्षा आता पुरे झाली, आता त्यांना मुख्यमंत्री केले पाहिजे’, अशी भूमिका प्रियंका गांधी यांनी घेतल्याचे समजते.

गांधी कुटुंबातील सदस्य आपल्या पाठिशी उभे राहात नसल्याचे दिसू लागल्यामुळे अशोक गेहलोत यांनी समर्थक आमदारांना राजीनाम्याचे अस्त्र उगारण्याचा आदेश दिला. गेहलोत यांच्या सुमारे ९० आमदारांनी उघडपणे सचिन पायलट यांना विरोध केला असून, गेहलोत यांनी गांधी कुटुंबाविरोधात केलेले हे अप्रत्यक्ष बंड असल्याचे मानले जाते.

राजस्थानमधील सत्तासंघर्षांचा पेच सोडवण्यासाठी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन यांना जयपूरला पाठवून काँग्रेसच्या आमदारांचे वैयक्तिक मत जाणून घेण्यास सांगितले होते. मात्र, रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री निवासस्थानावरील पूर्वनियोजित बैठकीला हे आमदार फिरकले नाहीत. विधानसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी ऐनवेळी बैठकीचे ठिकाण बदलून अन्यत्र गेहलोत समर्थक आमदारांची बैठक घेतली. या आमदारांनी विधानसभाध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे राजीनामे देऊन काँग्रेस सरकारला अस्थिर केले आणि गांधी कुटुंबावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. गेहलोत यांचे निष्ठावान शांती धारिवाल, सी. पी. जोशी आणि प्रतापसिंह खाचरियावास या तिघांनी खरगे आणि माकन यांच्याकडे मांडलेल्या प्रस्तावांमध्ये, गेहलोत निष्ठावानाला मुख्यमंत्री करावे, काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक झाल्यावर नव्या पक्षाध्यक्षाने मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घ्यावा, असा आग्रह धरण्यात आला. पण, हे प्रस्ताव खरगे आणि माकन यांनी फेटाळले. माकन आणि खरगे यांनी सोमवारीच दिल्ली गाठून राजस्थानचा अहवाल सोनिया गांधींना सादर केला.

पक्षाध्यक्षपदासाठी गेहलोतांना विरोध?

काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना काढण्यात आली असली तरी अजूनही कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. अशोक गेहलोत आणि शशी थरूर यांच्यात लढत होईल, असे चित्र निर्माण झाले होते. पण, रविवारी गेहलोत निष्ठावानांकडून झालेल्या ‘बंडा’च्या हालचालींमुळे गेहलोत यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या उमेदवारीला काँग्रेस कार्यकारिणीतील सदस्यांकडून विरोध होऊ लागला आहे. गेहलोत यांच्याऐवजी कमलनाथ यांच्या नावाची चर्चा सोमवारी केली जात होती. राजस्थानमधील पेचप्रसंग सोडवण्यासाठी सोनिया गांधी यांच्या आदेशावरून कमलनाथही सोमवारी दिल्लीत दाखल झाले. संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाळ हे केरळहून ‘भारत जोडो’ यात्रा सोडून दिल्लीत दाखल झाले. गेहलोत आणि पायलट यांच्यामध्ये कमलनाथ यांना मध्यस्थी करण्यास सांगितले जाऊ शकते. तरीही पेच न सुटल्यास पक्षाध्यक्षपदाचा उमेदवार बदलला जाऊ शकतो, अशीही चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.