‘‘भारताच्या सर्वागीण विकासासाठी समाजाचे संघटन करणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ध्येय आहे. संघ वैयक्तिक स्वार्थाचा त्याग करून देशासाठी त्याग करायला शिकवतो,’’ असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. भागवत हे मेघालयाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. येथील विविध संघ पदाधिकारी व सामाजिक संघटनांच्या नेत्यांची ते भेट घेणार आहेत.
भागवत म्हणाले, की अध्यात्मावर आधारित प्राचीन मूल्यांवर रुजलेली श्रद्धा ही भारतीयांना परस्परांशी बांधून ठेवणारी शक्ती आहे. ‘भारतीय’ अथवा ‘हिंदू’ ही समानार्थी भू-सांस्कृतिक ओळख आहे. त्या अर्थाने आपण सर्व ‘हिंदू’ आहोत. भारतीयांवर प्राचीन काळापासून त्याग-बलिदानाच्या परंपरेचे संस्कार आहेत. आमचे पूर्वज परदेशात गेले व त्यांनी जपान, कोरिया, इंडोनेशिया आदी अनेक देशांतही समान मूल्ये रुजवली.
करोना जागतिक महासाथीच्या काळात भारताने विविध देशांना लस पाठवून मानवतेची सेवा केली. श्रीलंकेच्या आर्थिक संकटात या देशाच्या पाठीशी भारत उभा राहिला. जेव्हा भारत सामर्थ्यवान होतो, तेव्हा प्रत्येक नागरिक सामर्थ्यशाली होतो.