आज दि.22 आॕगस्ट च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका,
रुग्णालयात भरतीची तयारी

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असून अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र असं असलं तरी करोनाचं संकट काही टळलेलं नाही. सरकारने आधीपासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन निती आयोगाचे सदस्य वीके पॉल यांनी गेल्या महिन्यात काही सूचना दिल्या आहेत.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री
कल्याणसिंह यांचे निधन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याणसिंह यांचे शनिवारी रात्री 9 वाजून 15 मिनिटांनी निधन झाले. कल्याण सिंह 89 वर्षाचे होते. त्यांचे अंतिम संस्कार 23 ऑगस्टला होणार आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी कल्याण सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त करीत राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

त्यांचे आदर्श आणि संकल्प पूर्ण
करण्यासाठी कठोर परिश्रम करू

लखनऊला पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. कुटुंबातील सदस्यांना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आम्ही सर्व त्यांचे आदर्श आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करू. भगवान श्री राम त्यांच्या दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान देवो. यावेळी त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला.

गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्यांसाठी
मोफत ‘मोदी एक्स्प्रेस’ धावणार

राज्य परिवहन एसटी महामंडळातर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी देण्यात येणाऱ्या एसटी सेवेला यंदाच्या वर्षी चाकरमान्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. कोकणात जाण्यासाठीच्या गाडय़ांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. ट्रेनसाठीही कोकणवासीयांची गर्दी होत आहे. गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्यांसाठी मोफत ‘मोदी एक्स्प्रेस’ धावणार आहे. दादर स्थानकाहून ही एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे. नारायण राणे यांना मंत्रीमंडळात स्थान दिल्याने आभार मानण्यासाठी ही एक्स्प्रेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्थमंत्र्यांनी मागितले
इन्फोसिसकडे स्पष्टीकरण

अडीच महिन्यानंतरही करदात्यांना प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टलवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्थ मंत्रालयाने याची दखल घेत इन्फोसिसचचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सलील पारेख यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं असून समन्स बजावलं आहे. सलील पारेख यांना २३ ऑगस्टला अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी स्पष्टीकरण मागितले आहे.

परमेश्वराने ठाम भूमिका घेतली
म्हणूनच कोरोना आणि पूर आला

करोना महामारीचं संकट आणि राज्यात दरवर्षी निर्माण होणारी पूरस्थिती या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी एक अजब तर्क लावल्याचं पाहायला मिळत आहे. विश्वजित कदम म्हणाले कि, “परमेश्वराने ठाम भूमिका घेतली म्हणूनच कोरोना आला आणि पूर आला. परिणामी आपल्याला घरात बसावं लागलं.” ते शनिवारी (२१ ऑगस्ट) सांगलीत पार पडलेल्या पूर परिषदेत बोलत होते. दरम्यान, विश्वजित कदम यांनी केलेल्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी
प्रवेश परीक्षा लांबणीवर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा लांबणीवर पडली आहे. ही परीक्षा 22 ऑगस्ट म्हणजे आज होणार होती. मात्र, आता ही ऑनलाईन परीक्षा 5 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास वारंवार मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे परीक्षेची तारीखही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबई, नाशिकमध्ये
मुसळधार पावसाचा इशारा

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने राज्याच्या अनेक ठिकाणी हजेरी लावली होती. 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असतानाच आता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढच्या चोवीस तासांत मुंबईसह कोकण आणि नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भासह तामिळनाडूमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हा पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

पेट्रोलच्या किंमती
10 पैशांनी कमी झाल्या

बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत आणि अनेक शहरांमध्ये डिझेल 100 रुपयांहून अधिक विक्री होत आहे. मात्र आज रविवारी तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. तेल कंपन्या सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात आणि कंपन्यांनी रविवारसाठीही नवीन दर जारी केले आहेत. आजच्या किमती पाहता, इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार इंधनाचे दर खाली आले आहेत.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.