आज दि.२७ एप्रिल च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

पंतप्रधान मोदी यांनी इंधन
दरांवरुन महाराष्ट्राला सुनावलं

देशात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीत नरेंद्र मोदींनी इंधन दरांवरुन महाराष्ट्राला सुनावलं आहे. मोदींनी इंधनवरील व्हॅट कमी न करण्याच्या राज्यांची थेट नावच घेतली आणि खडे बोल सुनावले. देशहितासाठी सहा महिन्यांसाठी का होईना व्हॅट कमी केला पाहिजे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

केंद्राकडून महाराष्ट्राला आर्थिक बाबतीत
सापत्न वागणूक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक दिली जात असल्याने उद्धव ठाकरेंनी नाराजी जाहीर केली आहे. नागरिकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून हे स्पष्ट करणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले आहे. महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात ( डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. असं असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे,” अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणतात, महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात पेट्रोल 3 रुपयांनी स्वस्त फार काही फरक नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदी सरकारवर सडकून टीका केली. “राज्याच्या निर्णयाने फक्त दोन ते तीन रुपयांचा फरक पडतो. केंद्र सरकार जेव्हा कच्चे तेल विकत घेतं तेव्हाचे कर आणि नंतर राज्यांच्या कराचा प्रश्न येतो. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रापेक्षा पेट्रोल तीन रुपयांनी स्वस्त आहे. फार काही आभाळाएवढा फरक नाही”.

मानवामध्ये प्रथमच H3N8 बर्ड
फ्लूचा संसर्ग आढळला

मानवामध्ये प्रथमच H3N8 बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या हेनान प्रांतात बर्ड फ्लूच्या H3N8 स्ट्रेनचा पहिला मानवी संसर्गाची नोंद झाली आहे. मंगळवारी मीडिया रिपोर्टमधून ही माहिती मिळाली. त्याच वेळी, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने जारी केलेल्या निवेदनात ही बाब घोषित करण्यात आली आहे. पण त्याचवेळी लोकांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका कमी असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे फार घाबरण्यासारखे काही नाही. H3N8 बद्दल माहिती देताना चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने सांगितले की, एका चार वर्षांच्या मुलाला याचा संसर्ग झाला होता.

महाराष्ट्रात पुन्हा मास्कची
सक्ती होण्याची शक्यता

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती होऊ शकते, असे संकेतही दिले. तसेच, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार असून, या बैठकीनंतर कदाचित या संदर्भातील निर्णय होऊ शकतो, असंही ते म्हणाले आहेत.

गांधी बाधा वर उपाय एकच
शिवछत्रपती महाराज : संभाजी भिडे

संभाजी भिडे यांनी हिंदुस्थानला तीन बाधा झाल्याचं विधान केलं. “एखाद्या व्यक्तीच्या जीवनात भूतबाधा होते. समाजात काही कार्यक्रमात खाण्या-पिण्यात अनेकांना विषबाधा होते. या बाधांवर उपाय आहेत. पण हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच्छ बाधा, दुसरी आंग्ल बाधा आणि तिसरी गांधी बाधा. या तीन बाधांवर तोडगा कोणता असेल तर ते शिवछत्रपती आणि संभाजी महाराज. त्यांना प्रिय असणारं कार्य पूर्ण कसं होईल? यासाठी दैनंदिन जीवनात प्रयत्न करायला हवा”, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.

समान नागरी कायद्याला
मुस्लिम बोर्डाकडून ठाम विरोध

गेल्या अनेक वर्षांपासून समान नागरी कायद्याच्या मुद्यावरून सुरू असलेला वाद आता पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश सरकारने नुकतीच राज्यात समान नागरी कायदा अंमलात आणण्यासंदर्भात घोषणा केलेली असताना त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड अर्थात एआयएमपीएलबीनं तीव्र विरोध करत ठाम भूमिका जाहीर केली आहे. मुस्लीम लॉ बोर्डाकडून यासंदर्भात सरचिटणीस हझरत मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

कराची विद्यापीठात आत्मघाती
बाँबस्फोट सात जणांचा मृत्यू

पाकिस्तानातील कराची विद्यापीठात बॉम्बस्फोटात तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कराची शहरात असलेल्या या विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. कराची विद्यापीठाच्या कन्फ्युशियस इमारतीजवळ हा स्फोट झाला. सिंध पोलीस प्रमुखांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. प्राथमिक तपासात बुरखा घातलेल्या महिलेने ही घटना घडवून आणल्याचेही त्यांनी सांगितले. दुपारी व्हॅनजवळ आत्मघाती स्फोट झाला.

रथाला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने
अकरा जणांचा मृत्यू पंचवीस जखमी

तंजावर इथे एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान पहाटे तीनच्या सुमारास दुर्घटना घडली. ५० पेक्षा जास्त जण रथ ओढत असतांना रथाच्या कळसाचा स्पर्श उघड्या वीजवाहक तारांना झाल्याने बसलेल्या वीजेच्या झटक्यात २५ पेक्षा जास्त होरपळून निघाले. या दुर्घटनेत ७ जणांचा तात्काळ मृत्यु झाला, तर चार जण उपचारादरम्यान दगावले असून १५ जण जखमी झाले आहेत, जखमीपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अचानक लिफ्ट कोसळली अन् 10 विद्यार्थी थोडक्यात बचावले

गाझियाबाद येथील आयएमएस युनिव्हर्सिटी कोर्सेस कॅम्पसच्या मागे बांधलेल्या वसतिगृहाची लिफ्ट तुटल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. लिफ्टमध्ये असलेल्या 12 विद्यार्थ्यांपैकी 10 जखमी झाले आहेत, असं सांगण्यात येत आहे.
आयएमएसच्या ध्रुव बॉईज हॉस्टेलमध्ये 12 विद्यार्थ्यांनी भरलेली लिफ्ट पाचव्या मजल्यावरून खाली येत असताना ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. लिफ्ट कोसळून 10 विद्यार्थी जखमी झाले. एका विद्यार्थ्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं असून एका विद्यार्थ्यांच्या पाठीला दुखापत झाली आहे. फक्त सहा लोकांची लिफ्टची क्षमता असतानाही क्षमतेच्या दुप्पट म्हणजे तब्बल 12 विद्यार्थी लिफ्टमध्ये चढले होते.

इंग्लंडला मिळाला नवा टेस्ट कॅप्टन, भारताला चॅम्पियन बनवणारा दिग्गज होणार कोच!

इंग्लंडचा नवा टेस्ट कर्णधार जवळपास निश्चित झाला आहे. ऑलराऊंडर बेन स्टोक्स ही जबाबदारी पार पाडायला तयार झाला आहे. काही दिवसांपूर्वी जो रूटने टेस्ट टीमची कॅप्टन्सी सोडली होती. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे नवे डायरेक्टर रॉब की यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर स्टोक्सने कर्णधारपद स्वीकारायला होकार दिला आहे, त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्ड लवकरच नव्या टेस्ट कर्णधाराची घोषणा करू शकते.
रॉब की यांच्यासोबत झालेल्या बैठकीत स्टोक्सने काही अटीही ठेवल्याची माहिती आहे. दोन सीनियर बॉलर जेम्स अंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना पुन्हा टीममध्ये घेण्याची इच्छा स्टोक्सने बोलून दाखवली आहे

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.