टोपेंनी पत्रकार परिषदेमध्ये दिली सविस्तर माहिती
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील किती जणांना हे लसीकरण केलं जाणार आहे, त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, किती लसी लागणार आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. एक मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या तयारीसंदर्भातही टोपेंनी भाष्य केलं आहे.
“आपण सर्वच जण १ मे ची वाट पाहत आहेत १८ ते ४४ वर्षाच्या लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर टाकण्यात आलीय. ही जबाबदारी स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आम्ही मंत्रीमंडळाला एक नोट तयार करुन पाठवली आहे. यामध्ये मोफत दिली तर किती खर्च, काही घटकांना मोफत दिली तर किती खर्च यासंदर्भातील वेगवेगळे पर्याय आणि आकडेवारी देण्यात आलीय,” असं टोपे म्हणाले.
पुढे बोलताना टोपेंनी राज्यामधील किती जणांना नव्या टप्प्यामध्ये लसीकरण करण्यात येणार आहे, किती लसी लागणार आहेत याबद्दल माहिती दिली. “५ कोटी ७१ लाख लोकं हे या वयोगटातील आहेत. दोन लसींचे डोस द्यायचे असतील तर १२ कोटींच्यादरम्यान लसी लागणार आहेत. त्याचा खर्च साडेसात हजार कोटींच्या वर जाईल,” असं टोपे म्हणाले आहेत.
राज्यातील सर्व नागरिकांना लस मोफत द्यावी का यासंदर्भातील निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. लवकरच मंत्रीमंडळाची बैठक होणार असून त्यामध्ये लसीकरणासंदर्भातील निर्णय घेतला जाईल आणि तो मुख्यमंत्री जाहीर करतील असं टोपे म्हणालेत. मात्र त्याच वेळी त्यांनी १ मे पासून सुरु होणाऱ्या १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी लस उपलब्ध करुन देण्याबद्दल भारतात लसनिर्मिती करणाऱ्या दोन्ही कंपन्यांकडे विचारणा केल्याचे सांगत दोन्ही कंपन्यांकडून उत्तर आलेलं नाही असंही म्हटलं आहे