साखर कारखान्यांकडून होणारी काटामारी बंद होण्याची वाट आता मोकळी झाली आहे. वजनकाटय़ांची फेरतापसणी करा. वैधमापन शास्त्र अधिकाऱ्यांनी लावलेल्या टॅगशी छेडछाड करू नका. सर्व वजने संगणकीकृत, ऑनलाइन करा, असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले आहेत.
साखर कारखाने काटामारी करतात, हा शेतकरी आणि शेतकरी संघटनांचा जुना आरोप आहे. खासगी आणि कारखान्यांच्या वजनकाटय़ावरील वजनात तफावत दिसून येते. वैधमापन शास्त्र अधिकाऱ्यांनी तपासणी करून टॅग लावल्यानंतर त्याच्याशी छेडछाड केली जाते. खासगी वजनकाटय़ांवर वजन केलेला ऊस कारखानदार घेत नाहीत, असे आरोप अनेकदा केले जात होते. पण, त्याबाबत ठोस उपाययोजना होत नव्हती.
साखर आयुक्तालयाने या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन मागील गाळप हंगामात या बाबतचा प्रस्ताव वैधमापन शास्त्र विभागाच्या महासंचालकांना पाठविला होता. तो प्रस्ताव मंजूर झाला असून, साखर आयुक्तांनी बुधवारी (९ नोव्हेंबर) काढलेल्या आदेशात म्हटले आहे, राज्यातील सर्व कारखान्यांनी आपल्या वजनकाटय़ांची फेरतपासणी करून घ्यायची आहे. तपासणी करून वैधमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकदा टॅग लावल्यानंतर टॅगशी कोणतीही छेडछाड करायची नाही. वजन काटय़ाच्या केबल अखंड असाव्यात, त्या कुठेही जोडलेल्या नसाव्यात, त्या केबलला कोणतेही अनधिकृत उपकरण जोडलेले नसावे. वजनकाटय़ाची पावती संगणकीकृत असावी. ज्या वाहनांतून ऊस आलेला आहे, त्या वाहनाचा क्रमांक पावतीवर असावा. पावती सही, शिक्क्यासह द्यावी. वजनकाटय़ाची सर्व माहिती ऑनलाइन करावी. महिती डिडिटल स्वरूपात उपलब्ध करून द्यावी. खासगी वजनकाटय़ावर वजन करून आणलेला ऊस नाकारता येणार नाही, असेही वैधमापन विभागाने म्हटले आहे.
शेतकरी आणि शेतकरी संघटनांची अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती. आता कारखान्यांवरील चुकीचे प्रकार थांबतील. कारखान्यांच्या वजनकाटय़ाबाबत पारदर्शकता येईल. खासगी वजनकाटय़ावर वजन केलेला ऊस आता नाकारता येणार नाही. संबंधित आदेश तत्काळ लागू झाले आहेत. काटे संगणकीकृत, डिजिटल करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. मात्र, पुढील हंगामापासून राज्यातील सर्व कारखान्यांचे वजनकाटे संगणकीकृत, डिजिटल होतील. असे साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले.