शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उन्हाळ्याच्या सुटीनंतर शाळा पुन्हा सुरु होण्याच्या तारखेची घोषणा केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पुढील शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरु होणार यासंबंधीची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून म्हणजेच 15 जूनपासून शाळांची घंटा वाजणार आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांच्या शाळा आजपासून सुरु होणार आहेत.
राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार 13 जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आलं आहे.. तर, आजपासून 15 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
विदर्भातील शाळा उशिरा
जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता विदर्भातील शैक्षणिक वर्ष 23 जून रोजी सुरू होणार आहे. दि. 27 जून 2022 रोजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विदर्भातील शाळांबाबत दि. 24 ते 25 जून 2022 रोजी या बाबींचे आयोजन करण्यात येऊन दि. 27 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत बोलावण्यात यावं असे निर्देश शिक्षण आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.
कोरोनाचे सर्व नियम बंधनकारक
शाळा सुरु करताना सुरुवातीला शाळा आणि इतर कर्मचाऱ्यांना शाळेत कोरोनाचे सर्व नियम पाळणं आवश्यक आहे. तसंच विद्यार्थ्यांनाही कोरोनाचे सर्व नियम पाळूनच शाळेत यायचं आहे असेही आदेश देण्यात आले आहेत.
पालकांनो ही घ्या काळजी
विद्यार्थ्यांनी शाळेत जाताना, शाळेत असताना आणि शाळेतून बाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे.
तसंच विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये एक लहान सॅनेटाईझरची बाटली असणं आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी कोणाच्याही संपर्कात आल्यानंतर किंवा कुठे स्पर्श केल्यानंतर सात हात सॅनेटाईझ करत राहणं आवश्यक आहे.
तसंच डबा खाताना आणि डबा खाऊन झाल्यानंतरही हात सॅनेटाईझ करत राहणं आवश्यक आहे.
शाळेतुन वर्गात विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणं महत्त्वाचं आहे.
तसंच मुलं शाळेतून घरी आल्यानंतर त्यांचे कपडे सॅनेटाईझ करून धुवायला टाकणे हेही महत्वाचं आहे.