शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालंय. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयानं बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली आहे. आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बाबासाहेबांचं निधन वृद्धापकाळानं झाल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेबांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना न्यूमोनिया झाल्याचं सांगण्यात आलं. काल त्यांच्या निधनाची अफवा पसरली. त्यानंतर, मात्र आज पहाटे त्यांचं निधन झालं. सकाळी साडे आठ वाजता बाबासाहेबांचं पार्थिव त्यांच्या पर्वती इथल्या निवासस्थानी घेऊन जाण्यात येईल. तर सकाळी 10 ते 10.30 दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहितीही डॉक्टरांनी दिलीये.
काही महिन्यांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यावेळी झालेल्या दोन ते तीन कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही घरी येऊन पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. दोन तीन कार्यक्रम वगळता त्यांनी नंतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती.
बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांची ओळख शिवशाहीर म्हणून महाराष्ट्राला आहे. जाणता
राजा ह्या महानाट्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास घराघरात पोहोचवण्याचं मोठं काम बाबासाहेबांनी केल्याचं मानलं जातं. हे महानाट्य फक्त महाराष्ट्रातच नाही तर आंध्र प्रदेश, गोव्यासह देशभरात नावाजलं गेलं. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 सालचा. म्हणजे ते शंभरीत होते. बाबासाहेबांना इतिहासकार म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी फक्त शिवरायांचाच इतिहास लिहिला असं नाही तर पेशव्यांच्या इतिहासावरही प्रकाश टाकला.
बाबासाहेब पुरंदरे यांचे राजकीय संबंधही महाराष्ट्राला सर्वश्रुत आहेत. 1970 च्या काळात बाबासाहेबांनी बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवसेनेच्या वाढीत महत्वाचं योगदान दिल्याचं मानलं जातं. 2015 साली त्यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. तसेच 2019 साली देशातला दुसरा मोठा नागरी सन्मान पद्म विभूषण देऊन गौरविण्यात आलं.