सार्वजनिक आरोग्य विभागाची 28 तारखेला पुन्हा परीक्षा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील चुकीची प्रश्नपत्रिका मिळालेल्या 589 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. अशा उमेदवारांची यादी मागवण्यात आली होती. त्यानुसार येत्या 28 तारखेला पुणे, नाशिक, लातूर, अकोला या केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.

दोन वेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाची भरती परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी झाली. न्यास कम्युनिकेशन या खासगी संस्थेमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. त्या ‘क’ वर्गाच्या 2739 जागांसाठी, तर ‘ड’ वर्गांच्या 3462 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. मात्र, परीक्षेपूर्वीच गोंधळ सुरू झाला. अनेकांनी उमेदवारांना हॉलतिकीट मिळाले नाहीत. अनेकांना केंद्र दुसरेच मिळाले, अशा तक्रारी होत्या. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील या शंकांचे एक पत्रकार परिषदे घेऊन नाशिकमध्ये निरसन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐन परीक्षेदिवशीही प्रचंड गडबडी झाल्या.

आरोग्य विभागाच्या परीक्षेदिवशी राज्यभरातील अनेक केंद्रांवर गोंधळ उडालेला दिसला. अनेक विद्यार्थ्यांनी त्याबाबत आरोप केले. विरोधी पक्षानेही सरकारला धारेवर धरले. एकट्या नाशिक विभागात गट-ड संवर्गासाठी एकूण 53 हजार 326 इतक्या उमेदवारांनी अर्ज केले होते. न्यासाने परीक्षेसाठी समन्वय नियुक्त केले. त्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले. मात्र, ऐन पेपरच्या दिवशी या समन्वयकांचे फोनच लागले नाहीत. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी काही सुटल्याच नाहीत. काही ठिकाणी पेपर फुटल्याचे आरोप झाले, तर कुठे तब्बल दोन-दोन तास उशिराने प्रश्नपत्रिका मिळाली. त्यात गट ‘क’ च्या 11 संवर्गातील 589 उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका मिळाली. आता या उमेदवारांची पुन्हा परीक्षा घेण्यात येत आहे.

इतके सारे प्रकार होऊन. परीक्षेबाबत तक्रारी असूनही परीक्षेचे आयोजन करणाऱ्या न्यास संस्थेने मात्र, चक्क निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर आरोग्य विभागाने या उमेदवारांना 7 डिसेंबरच्या आत नियुक्त्या देण्याचा घाट घातला. मात्र, परीक्षेत झालेल्या गोंधळावर साऱ्यांचे मौन होते. हा प्रश्न शेवटी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यापर्यंत गेला. त्यांनी नियुक्त्यांबाबत पारदर्शक प्रक्रिया राबणार असल्याचे म्हटले. जिथे परीक्षेत गोंधळ झाला, तक्रारी आहेत, त्यांचे निराकरण केल्याशिवाय नियुक्त्या दिल्या जाणार नाहीत, अशी भूमिका घेतली. त्यानंतर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.