राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन, तस्करी देखिल
करतात : भाजपने केले धक्कादायक वक्तव्य
काँग्रेस नेते राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन असून तस्करी देखिल करतात असं धक्कादायक वक्तव्य कर्नाटकमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी केलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अशिक्षित असा उल्लेख केल्यामुळे आधीच वाद निर्माण झालेला असताना आता भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे त्यात भर पडली आहे. काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष डी शिवकुमार यांनी मोदींबद्दलच्या त्या ट्वीटवरुन आक्षेप नोंदवला असून डिलीट करण्याचा आदेश दिला आहे.
अमित शहांसोबत फडणवीसांची बैठक संपली, साखर कारखान्यांवरील कारवाई थांबणार?
राज्यात एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या संबंधीत साखर कारखान्यावर ईडीकडून कारवाई होत आहे. तर दुसरीकडे, साखर कारखान्यांच्याबाबतीत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसयांनी सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी, आयकरच्या नोटिसांवर तोडगा काढणार असून कोणत्याही कारखान्यावर कारवाई होणार नाही. सहकारी कारखान्यांना उभारी देण्याचा प्रयत्न’ असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं.
नवी दिल्लीतील नाँर्थ ब्लॉकमध्ये केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत सहकारावर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांच्यासह विखे, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, राहुल कुल, रणजितसिंह मोहिते-पाटील उपस्थितीत होते. या बैठकीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सीमाभागात चीनकडून
आता हालचाली वाढल्या
अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात चीनकडून सातत्याने अतिक्रमण केलं जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. चीनबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेवरून विरोधकांनी वारंवार टीका केल्यानं एकीकडे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच सीमाभागात चीनकडून आता हालचाली वाढवण्यात आल्यामुळे सामरिक दृष्ट्या देखील या मुद्द्यावरून तणाव निर्माण होऊ लागला आहे. मात्र, भारतीय लष्कर कोणत्याही कारवाईसाठी सज्ज असल्याचा ठाम निर्धार इस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी स्पष्ट केलं आहे. सीमाभागात चीनीच्या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी भारत तयार असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
‘लष्कर ए तोयबा’ संघटनेच्या
सहा दहशतवाद्यांना कंठस्थान
भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं आहे. राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये भारतीय लष्कराने ही कारवाई केली. भारतीय लष्कराच्या १६ पोलीस बटालियनकडून याच भागात दडून बसलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अजूनही चकमक सुरु आहे.
देशात ९९ कोटी लोकांना
लसीचे डोस दिले
देशातील करोनाबाधितांची सख्या सातत्याने कमी होत आहे. यासोबत आणखी एक चांगली बातमी आहे. भारताने करोनाविरोधातील लढाईत मोठी कामगिरी करत लसीकरणात ९९ कोटी डोसचा टप्पा पूर्ण केला आहे. भारतात तब्बल ९९ कोटी लोकांना करोनाची लस देण्यात आली आहे. देशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना लसीकरणातील ही विक्रमी कामगिरी दिलासादायक आहे. देशात ९९ कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांनी ट्विट करून दिली आहे.
जानेवारी महिन्यात सोलापुरात
पक्षिमित्र संमेलन भरणार
सोलापुरात येत्या जानेवारी महिन्यात ३४ वे महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन भरणार आहे. या संमेलनात वनमहर्षी मारूती चित्तमपल्ली व बी. एस कुलकर्णी या दोन्ही ज्येष्ठ पक्षिमित्रांच्या सन्मानार्थ काही विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सोलापुरात ७, ८ व ९ जानेवारी २२ रोजी हे संमेलन आहे. डॉ. मेतन फाउंडेशनने आयोजिलेल्या संमेलनासाठी सामाजिक वनीकरण व महाराष्ट्र वन विभागाच्या सोलापूर कार्यालयांचे सहकार्य लाभणार आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत
४० टक्के तिकीट महिलांना देणार
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. प्रियांका गांधी काँग्रेसकडून रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश मधील महिलांना राजकारणात येण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकीट महिलांना देणार असल्याची घोषणा प्रियांका गांधी यांनी केली. आज लखनऊ येथे त्या बोलत होत्या. ही पत्रकार परिषद महिलांना समर्पित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘लड़की हूँ लड सकती हूँ’ हा नारा यावेळी त्यांनी दिला.
माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी दिला
भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा
माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. बाबुल सुप्रियो लोकसभेचे खासदार होते. यावेळी त्यांनी भाजपा सोडताना आपल्याला खूप वाईट वाटल्याचं म्हटलं आहे. बाबुल सुप्रिया यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणात संधी दिल्याबद्दल तसंच पक्षात महत्त्वाच्या भूमिका दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.
देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये
यवतमाळ, चंद्रपूर, शिराळाचा समावेश
देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ३ पोलीस स्टेशनचा समावेश झाल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिलीय. यवतमाळ, चंद्रपूर आणि शिराळा या तीन पोलीस स्टेशनचा या यादीत समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच राज्यात अनेक चांगले पोलीस स्टेशन आहेत.
अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला
फिलिपिन्समधून अटक
कधीकाळी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीसाठी काम करणाऱ्या सुरेश पुजारीला बेड्या ठोकण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस सुरेश पुजारीच्या मागावर होते. २००७मध्ये सुरेश पुजारीनं भारताबाहेर पलायन केलं होतं. तेव्हापासून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अखेर, पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं असून सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून अटक करण्यात आली आहे.
मुलीने इच्छेविरोधात लग्न केले,
पित्याने कुटुंबातील सात जणांना जाळले
मुलीने इच्छेविरोधात लग्न केलं म्हणून पित्याने कुटुंबातील सात जणांना जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानमधील एका व्यक्तीने त्याच्या दोन मुली आणि चार नातवंडांसह त्याच्या कुटुंबातील सात सदस्यांना जिवंत जाळलं. मुलीच्या प्रेमविवाहाला आरोपीचा विरोध होता आणि त्या रागातून त्याने हे कृत्य केलं. या घटनेत केवळ आरोपीचा जावई बचावला असून इतर सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
सनदी अधिकारी मिलिंद, मनिषा
म्हैसकर यांच्यावर मधमाशांचा हल्ला
सनदी अधिकारी मिलिंद आणि मनिषा म्हैसकर यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. नाशिकमधील अंजनेरी भागात ट्रेकसाठी गेले असता त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. मनिषा म्हैसकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. मिलिंद म्हैसकर सर्वात पुढे असल्याने त्यांच्यावर मधमाशांचा हल्ला जास्त झाला. दरम्यान त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती मनिषा म्हैसकर यांनी दिली आहे.
SD social media
9850 60 3590