ठाकरे सरकार वाचवण्यासाठी पवारांची रणनीती,थेट शिंदेनाच ‘आऊट’ करण्याचा प्लॅन
महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी या सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी कंबर कसली आहे. विधानसभेच्या उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पवारांनी खास सूचना केल्या आहेत. त्यानुसार थेट एकनाथ शिंदे यांना आऊट करण्याचा पवारांचा प्लॅन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेतील शिंदे समर्थक आमदार हे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. पण, त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईमध्ये विधानसभेत यावे लागेल. त्यावेळी शिंदे यांना रोखण्याचा प्लॅन पवारांनी बनवल्याचं समजतंय.
विधानसभेत शिवसेनेच्या आमदारांच सभासदत्व रद्द झाल्यावर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी संख्याबळाचं गणित बदलणार आहे. या बदललेल्या गणिताचा फायदा ठाकरे सरकारला करून देण्याची पवारांची योजना आहे. एकनाथ शिंदे यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झालं तर राजकीय चित्र बदलू शकतं, त्यामुळे त्यावर देखील आता महाविकास आघाडी सरकार लक्ष केंद्रीत करणार आहे.
शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांवर ईडीची सर्वात मोठी कारवाई
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी अर्जुन खोतकर यांच्या कारखान्यावर धाड टाकली होती. याशिवाय खोतकर यांच्याशी संबंधित काही मालमत्तांवर देखील धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता ईडीने खूप मोठी कारवाई केली आहे. ईडीने खोतकर यांचा जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची 200 एकर जागा, कारखान्याची इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री जप्त केली आहे. शिवसेनेसाठी हा खूप मोठा फटका आहे. कारखान्याच्या जमीनीचा जो व्यवहार झाला आहे त्यामध्ये अनियमितता आढळल्याचा आरोप आहे. याच आरोपांप्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे गुवाहाटीहून मुंबईला रवाना? राजकीय नाट्याला वेगळं वळण
मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय नाट्य सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि भारतीय जनता पार्टीसोबत सत्ता स्थापन करावी, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे.
एकीकडे या राजकीय घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला आहे.
यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय नाट्याला वेगळं वळण लागलं आहे. बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे मुंबईला रवाना झाल्याची माहिती समजत आहे. याबाबतचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. एकनाथ शिंदे मुंबईला आल्यानंतर कोणत्या राजकीय घडामोडी घडणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. पण ते मुंबईलाच येणार की दिल्लीला जाणार याबाबत सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. पण त्यांनी गुवाहाटी सोडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
शिवसैनिक चवताळले, आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर थेट हल्ला
शिवसेनेच्या सत्तेला पाठ दाखवत बंड पुकारुन गुवाहाटीला निघून गेलेल्या आमदारांविरोधात आता शिवसैनिकांच्या मनात रोष निर्माण होताना दिसत आहे. मुंबईच त्याचीच प्रचिती येताना दिसत आहे. मुंबईतील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर हे पक्षाचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला जावून मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसैनिकांनी मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयावर हल्ला केला आहे.
‘म्हाडा’ सोडतीसाठी आता प्रतीक्षा यादी बंद – राज्य सरकारने घेतला निर्णय!
म्हाडा सोडतीतील प्रतीक्षा यादी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वर्षानुवर्षे प्रतीक्षा यादीवरील घरांचे वितरण सुरूच असून त्याद्वारे भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगून सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.वर्षानुवर्षे प्रतीक्षा यादी संपत नसून २०१४ पासूनच्या अनेक प्रकरणात त्यापूर्वीच्या सोडतीतील घरांचे वितरण सुरूच असल्याचे मुंबई मंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याचे मुंबई मंडळाने प्रतीक्षा यादी रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची वाढपी बनून वारकऱ्यांची सेवा; सपत्नीक घेतले पालखीचे दर्शन
पालखी सोहळ्याचे स्वागत गुरुवारी पोलीस आयुक्त अभिनव गुप्ता यांनी केले. यावेळी त्यांनी वारक-यांना वाढपी म्हणून जेवण देत त्यांचा पाहुणचार केला. तसेच त्यांच्या सोबत भोजनाचाही आस्वाद घेतला.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सपत्नीक संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले. तसेच वारकऱ्यांसोबत प्रसादाचा लाभ घेतला.तब्बल दोन वर्षानंतर वारकऱ्यांचा पाहुणचार करण्याची संधी पुणेकरांना गुरुवारी मिळाली. दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती.दिवे घाटातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तर तुकोबांची पालखी ही पुणे सोलापुर मार्गाने पंढरपुरच्या दिशेने प्रवास करणार आहे.
राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड! कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी तुडवलं
राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कथित बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. त्यामुळे राज्यासह देशात गोंधळ सुरू आहे. अशातच केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. केरळ राज्यातील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड येथील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. भारतीय युवक काँग्रेसने एका ट्विटमध्ये आरोप केला आहे की “राहुल गांधींच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्यांनी SFI चे झेंडे हातात धरले होते”. दरम्यान, SFI कडून अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही.
राष्ट्रपती निवडणूक: द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल, पंतप्रधान मोदींसह एनडीए नेत्यांची उपस्थिती
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आली आहे. येत्या १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. एनडीए आणि विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी आज संसद भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे नेते उपस्थित होते.
खाद्यतेल आणखी स्वस्त, सर्वसामान्यांना दिलासा; 10-15 रुपयांनी दर घसरले
खाद्यतेलाबाबत मोठा बातमी समोर येत आहे. बाजारात सध्या खाद्यतेलाच्या अनेक बड्या कंपन्यांनी तेलाच्या किमती कमी केल्या आहेत. अदानी विल्मर ते पतंजली ब्रँडच्या खाद्यतेलाच्या किमती 10 ते 15 रुपयांनी घसरल्या आहेत.आंतरराष्ट्रीय दरात घट झाल्यामुळे सरकारने वेळीच हस्तक्षेप केल्याने खाद्यतेलाच्या किमती खाली आल्याचे अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले. जून महिन्याच्या सुरुवातीपासून देशभरातील कॅनबंद खाद्यतेलाच्या सरासरी किरकोळ किमती खाली आल्या आहेत. सध्या देशात शेंगदाणा तेल वगळता खाद्यतेलाचे दर 150 ते 190 रुपये किलोवर आहेत.
‘मोदी सरकार करणार महाराष्ट्राचे विभाजन, राज्यांची संख्या 50 करण्याचा प्लॅन’
‘देशातील राज्यांची संख्या 50 करण्याची मोदी सरकारची योजना असून महाराष्ट्राचे विभाजन करून दोन राज्य होणार आहेत,’ असा दावा भाजपाच्या वरिष्ठ मंत्र्यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी या प्रस्तावावर गांभीर्यानं विचार करत असून 2024 मधील लोकसभा निवडणुकीनंतर ते हा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपाचे मंत्री उमेश कुट्टी यांनी हा दावा केलाय. कुट्टी हे कर्नाटकमधील वरिष्ठ भाजपा नेते असून बोम्मई सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत.
‘अग्निवीर’ योजनेअंतर्गत व्हा भारतीय हवाई दलात सामील; बारावी उतीर्ण उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू
अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना आता सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाने ‘अग्निवीर वायू भरती प्रक्रिया-2022’ साठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक असलेले पात्र उमेदवार विविध पदांसाठी भारतीय हवाई दलाच्या careerindianairforce.cdac.in आणि agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटना भेट देऊन अर्ज करू शकतात. खालील पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. इच्छुक उमेदवार https://careerindianairforce.cdac.in/assets/joining या लिंकला क्लिक करून अधिकृत नोटिफिकेशन तपासून पाहू शकतात. अग्निवीर वायू भरती प्रक्रिया-2022 अंतर्गत अनेक पदांची भरती केली जाणार आहे.
दोन वर्षांनी दिवे घाट असा फुलला!
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातून निघून आज दिवे घाट पार करून पुढे जात आहे. ड्रोनच्या साहाय्याने या पालखी मार्गाचं चित्रीकरण केलं गेलं आहे. माउलीच्या पालखीचे आगमन पुणे ग्रामीण हद्दीत होत आहे. दिवे घाटामध्ये पोलिसांच्या ड्रोनद्वारे केलेले चित्रीकरण आहे. भक्तिभावपूर्ण वातावरणात विठ्ठलनामाच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यातून पुढे मार्गस्थ होत आहे.
कोरोनानंतर पालखीमध्ये वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून येत आहे. भक्तीमय वातावरणामुळे पुणे परिसरात उत्साहाला उधाण आलं. गुरुवारी वारकऱ्यांनी मेट्रो सफरीचाही आनंद घेतला. पुणेकरांचा पाहुणचार घेऊन दोन्ही पालख्या आज पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड निघाली वारीच्या वाटेवर! हरिनामाच्या गजरात धरला ठेका
महाराष्ट्रात एकीकडे राजकारण तापलं तर दुसरीकडे भक्तांच्या मांदियाळीत आळंदी आणि पंढरपूर गजबजून गेलं आहे. कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी राज्यात पंढरपूरची वारी होणार आहे. हरिनामाच्या गजरात अनेक भाविक पंढरपूरात दाखल होत आहेत. मराठीतील काही प्रसिद्ध कलाकारांनीही विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी वारीला हजेरी लावली आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडही वारीच्या वाटेवर निघाली आहे. प्राजक्तानं वारकऱ्यांबरोबर पायी पारी करत हरिभजनाच्या गजरात ठेकाही धरलाय. प्राजक्तानं तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.
अवघ्या आठ वर्षांच्या मुलाने १८ मिनिटांत पार केली यमुना!
बहुतेकांना वाहत्या पाण्याची भीती वाटते आणि तेच पाणी जर यमुनेसारख्या मोठ्या नदीतील असेल तर मग विचारूच नका. मात्र, प्रयागराजमधील एक आठ वर्षांचा मुलगा याला अपवाद आहे. शिवांश मोहिले नावाच्या या आठ वर्षांच्या मुलाने यमुनेच्या पाण्यात उतरून विक्रम केला आहे. त्याने अवघ्या १८ मिनिटांत यमुना नदी पार केली आहे. १८ मिनिटांमध्ये यमुना पार करणारा शिवांश पहिलाच मुलगा ठरला आहे. त्यापूर्वी, आराध्य श्रीवास्तव नावाच्या मुलाने २२ मिनिटांमध्ये यमुना पार केली होती.
SD Social Media
9850 60 3590