मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा आलेख कमी झाल्याने पालिका प्रशासनाकडून दिलासा व्यक्त केला जात होता. मात्र आता स्वाईन फ्लू ने डोकं वर काढल्याने पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. मीरा भाईंदर परिसरातील विविध भागात स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण आढळून आले असून या रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याशिवाय बदलापूर शहरात स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला आहे. बदलापूरातील डॉक्टरला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्ण आढळलेल्या भागात सर्व्हे केला आहे. डॉक्टरकडे परदेशातून आलेल्या नातेवाईकामुळे फ्लूची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी काळात स्वाईन फ्लूच्या रुग्णामध्ये वाढ झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रशासन सज्ज असून अशा रुग्णांसाठी मीरा भाईंदर महा पालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात २० खाटांचे विलगिकरण कक्ष उभारण्यात आले आहे. या ठिकाणी संशयित रुग्णांची चाचणी करण्यासाठीची व्यवस्था देखील करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
स्वाईन फ्लूची लक्षणे
याची लक्षणं सर्व साधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब आणि कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.