माझं काम ज्ञानदान करण्याचं, अर्थार्जनाचं नाही : डिसले गुरुजी यांचे प्रत्युत्तर

डिसले गुरुजींनी शाळेसाठी काय केलं? असा सवाल सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केला होता. त्याला ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजीत डिसले गुरुजी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझं काम ज्ञानदान करण्याचं आहे. अर्थार्जनाचं आणि पैसा देण्याचं काम माझं नाही, अशी प्रतिक्रिया डिसले गुरुजींनी व्यक्त केली आहे.

रणजीत डिसले गुरुजी यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांना अमेरिकेत जाण्यासाठी आलेला अडथळा, मीडियात बातमी आल्यानंतर मिळालेला न्याय आणि या दरम्यान त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर उत्तर दिलं. डिसले गुरुजींनी शाळेसाठी काय दिलं? असा सवाल सोलापूर जिल्हा परिदेच्या शिक्षण विभागाकडून विचारण्यात आला होता. त्याकडे लक्ष वेधले असता, मला पुरस्कार मिळाल्यानंतर अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. काय मिळालं?… काय मिळालं?… शाळेला… गावकऱ्यांना… अधिकाऱ्यांना… खरं तर शिक्षक म्हणून आपण ज्ञानदानाचं काम करत असतो. अर्थार्जनाचं, पैसा देण्याचं काम करत नाही. कुणाचीही ती अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही. मात्र ज्ञानदानाचं काम मी निष्ठेने करत आहे आणि करत राहील, अशी ग्वाही डिसले गुरुजी यांनी दिली.

माझ्या अर्जातील त्रुटी अधिकारी लगेचदूर करू शकले असते. ठिक आहे आता ते झालं. आता या गोष्टींचा बाऊ करण्यात काही अर्थ नाही. कदाचित आज उद्या मला परवानगी मिळूनही जाईल. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आम्ही त्यावर काम करत आहोत. अगदी उद्या रविवार असला तरी ऑफिस उघडून ती प्रक्रिया आम्ही पूर्ण करू, असं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने सांगितलं, असं डिसले गुरुजी म्हणाले.

शिक्षक ग्लोबल असो किंवा लोकल प्रोत्साहन हवेच
मीडियात हे प्रकरण आल्यावरच न्याय मिळाला का? असा सवाल त्यांना केला असता त्यांनी होय असं उत्तर दिलं. मला तेच म्हणायचे असं व्हायला नको. मीडियात आल्यावरच प्रकरण धसास लागायला नको. शिक्षक ग्लोबल असो किंवा लोकल सर्वांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे आणि पोषक वातावरण तयार केलं पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अमेरिकेतील ‘फुलब्राईट स्कॉलरशीप’ मला मिळाली आहे. त्यासाठी अध्ययन रजेबाबत मी अर्ज केला होता. मी डिसेंबरमध्ये हा अर्ज केला होता. ती प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित होती. ती होत नव्हती. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यांनी मला विहित नमुन्यातील काही गोष्टी पूर्ण करायला सांगितल्या होत्या. मी त्या गोष्टींची पूर्तता केल्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी परवानगी द्यायला सांगितली. मी अमेरिकत जात आहे. त्यासाठी सहा महिन्यांची अध्ययन रजा टाकली आहे, असं ते म्हणाले.

डिसले गुरुजी अमेरिकेत ‘पीस अँड एज्यूकेशन’ या विषयावर अभ्यास करण्यासाठी जाणार आहेत. आजची अशांत पिढी आणि निर्माण झालेला कॉन्फिलिक्ट या विषयावर ते संशोधन करणार आहेत. लोकांसमोर हा विषय आणायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.

अर्जामध्ये काही कागदपत्रं जोडणं गरजेचं होतं. त्यांनी यादी दिल्यानंतर मी ती पूर्ण करून दिली आहे. येत्या 25 जानेवारी रोजी डॉक्युमेंटेन्शन आणि मेडिकल चाचणी होणार आहे. त्यानंतर ऑगस्टमध्ये मी अमेरिकाल जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.