पुन्हा तारीख! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी शिवसेना पक्षात बंड केल्यानंतर आता शिवसेना पक्ष कोणाचा यावरुन वाद सुरू आहे. यावर अखेर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली. पुढची सुनावणी ही 26 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी पार पडली. गेल्या 27 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने निवडणूक आयोगाला एकनाथ शिंदे यांच्या गटाने केलेल्या दाव्यानुसार शिवसेना पक्षाबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. सोबतच या संदर्भात 1 नोव्हेंबरला सुनावणी घेण्यात येईल असा आदेश दिला होता.
आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर ही महत्त्वपूर्ण सुनावणी आहे. एकनाथ शिंदे यांच्या वतीने संजय किशन कौल तर सुभाष देसाई यांच्या वतीने कपील सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे ज्येष्ठ वकीलांनी बाजू मांडली. यावेळी कोर्टाने कार्यवाही 4 आठवड्यांनंतर निर्देशांसाठी सूचीबद्ध केली जाईल, असं सांगत 4 आठवड्यानंतर म्हणजे, 29 नोव्हेंबरला सुनावणी घेतली जाईल, असं स्पष्ट केलं.
राणानं दिलगिरी व्यक्त केली त्याचा आनंद, नाहीतर…; वादानंतर बच्चू कडूंचं अमरावतीमध्ये शक्तीप्रदर्शन
आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. रविवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कडू आणि राणा वादावर दोन तास चर्चा झाली. त्यानंतर सकाळी रवी राणा यांनी सकाळी फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर खुद्द फडणवीस यांनी खुलासा केला. यानंतर आज बच्चू कडू यांनी अमरातवतीमध्ये शक्तीप्रदर्शन करत मोर्चाला संबोधित केले.
मी राजीनामा देतो फक्त…, अब्दुल सत्तार यांचं मोठ विधान
सरकारकडून शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. यामुळे शेतकरी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. यावरून विरोधकांकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी या सर्व आरोपांसंदर्भात वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर मी बुधवारपर्यंत राजीनामा देऊ शकतो. मात्र मी राजीनामा दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील सिल्लोडमधून निवडणूक लढवून दाखवण्याची हिम्मत करावी असे अब्दुल सत्तार म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी देताच मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे. पण, चंद्रकांत खैरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्याविरुद्ध निवडणूक लढवून सिल्लोडमधून विजयी होऊन दाखवावे.
ॲाक्टोबरमध्ये महाराष्ट्रात २३ हजार कोटींचं जीएसटी संकलन, सप्टेंबरच्या तुलनेत झाली ‘इतकी’ वाढ
ऑक्टोबर महिन्यातील ‘वस्तू आणि सेवा कर’ अर्थात जीएसटी संकलनाची आकडेवारी समोर आली आहे. देशभरातून ऑक्टोबरमध्ये सुमारे दीड लाख कोटीहून अधिक जीएसटी संकलन झालं आहे. ऑक्टोबरमध्ये देशात सुमारे १ लाख ५१ हजार ७१८ कोटी रुपयांचं जीएसटी संकलन झाले आहे. जीएसटी संकलनाचा हा आकडा आतापर्यंतचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आकडा आहे.यापूर्वी, एप्रिल २०२२ मध्ये सर्वाधिक जीएसटी संकलन झालं होतं. ऑक्टोबरमध्ये देशातील वस्तू आणि सेवा कर संकलन (GST) १६.६ टक्क्यांनी वाढलं असून १.५१ लाख कोटी रुपये कर जमा झाला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलन १.३० लाख कोटी इतकं झालं होतं. तर यावर्षी एप्रिलमध्ये सर्वाधिक १.६८ लाख कोटी रुपयांचं विक्रमी कर संकलन झालं होतं.
“मी जर तीन महिन्यांचं बाळ, तर मला…” सुषमा अंधारे यांचा गुलाबराव पाटील यांना टोला
मी जर तीन महिन्यांचं बाळ, तर बाळाला काहीही करायचा अधिकार आहे. गुलाबभाऊ मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला सर्व अधिकार आहे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना हाणला. महाप्रबोधन यात्रेतील फलक चोरण्यावर ये डर मुझे अच्छा लगा, अशी टीकाही त्यांनी केली.
सैनिक शाळा प्रवेश परीक्षा ८ जानेवारीला; अर्जांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत
राष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे (एनटीए) अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (एआयएसएसईई) ८ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४अंतर्गत सहावी आणि नववीसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. देशातील ३३ सैनिकी शाळांसाठी ही परीक्षा घेतली जाईल. सहावीसाठी १० ते १२ वर्षे, नववीसाठी १३ ते १५ या वयोगटाची मर्यादा आहे. मुलींना केवळ सहावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल.
सैनिकी शाळा या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. या शाळांद्वारे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), इंडियन नेव्हल अॅकॅडमी (आयएनए), इतर लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. अधिकाधिक विद्यार्थ्यांना सैनिकी शाळांद्वारे शिक्षण मिळण्यासाठी संरक्षण मंत्रालयातर्फे १८ नवीन सैनिकी शाळांना मान्यता देण्यात आली आहे. देशातील १८० शहरांमध्ये ही प्रवेश परीक्षा घेतली जाईल. अधिक माहिती https://aissee.nta.nic.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डाॅ. हेमंत दाबके यांचे निधन
‘क्वाक्लियर इम्प्लांट’ ही कानावरील पुण्यातील पहिली शस्त्रक्रिया करणारे प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. हेमंत शंकर दाबके (वय ६०) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुमेधा दाबके आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. गेल्या काही महिन्यापासून डॉ. दाबके आजारी होते. उपचारादरम्यान त्यांचे अवयव निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालविली. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेतील शिक्षणानंतर दाबके यांनी बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी संपादन केली. ससून रुग्णालयाचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. एम. जी. टेपणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उपचाराचे प्रशिक्षण घेतले. कर्वे रस्त्यावर दाबके नर्सिंग होम हा दवाखाना त्यांनी सुरू केला.
विदेशी वित्त संस्थांची गेल्या सहा सत्रांमध्ये भारतीय शेअर बाजारात तब्बल एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवर अनेक क्षेत्रांत चढऊतार पाहायला मिळत आहेत. युरोपात खाद्यपदार्थ, नैसर्गिक वायुच्या किमती नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत. असे असताना विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजाराकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिल्याचे दिसत आहे. मागील सहा सत्रांमध्ये विदेशी वित्त संस्थांनी भारतीय शेअर बाजारात तब्बल १ अब्ज कोटी डॉर्लसची गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीचा असाच ओघ आगामी काळातही कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ जेजे इराणी यांचे निधन
‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी यांचे निधन झाले आहे. त्यांनी काल(सोमवार) रात्री अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. टाटा स्टीलकडून ही माहिती देण्यात आली आहे.
टाटा स्टीलकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ आता राहिले नाहीत. पद्मविभूषण डॉ. जमशेद जे इराणी यांच्या निधनाची माहिती देताना टाटा ग्रुप अत्यंत दु:खी आहे. त्यांनी काल (३१ ऑक्टोबर) रात्री १० वाजता जमशेदपूरमध्ये शेवटचा श्वास घेतला.
इंग्लंडनं रोखली न्यूझीलंडची वाट…
टी20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 33 सामने पार पडले आहेत. पण अजूनही या वर्ल्ड कपमध्ये ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मधून एकही टीम सेमी फायनलमध्ये पोहोचलेली नाही. आज ग्रुप 1 मध्ये झालेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड संघातला सामना चुरशीचा झाला. या सामन्यात न्यूझीलंडला सेमी फायनलमध्ये धडक मारण्याची चांगली संधी होती. पण इंग्लंडनं न्यूझीलंडला 20 धावांनी हरवून आपलं स्पर्धेतलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. त्यामुळे ग्रुप 1 मध्ये सध्या या दोन्ही टीमसह ऑस्ट्रेलियाही रेसमध्ये आहे.
SD Social Media
9850 60 3590