ब्रिटनच्या सत्ताधारी हुजूर (काँझव्र्हेटिव्ह) पक्षसदस्यांमध्ये करण्यात आलेल्या ताज्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष हाती आले आहेत. त्यानुसार परराष्ट्रमंत्री लिझ ट्रस यांनी माजी अर्थमंत्री व माजी कुलगुरू ऋषी सुनक यांच्यावर मोठी आघाडी मिळवली आहे.
काँझव्र्हेटिव्ह पक्षाचे हेच सदस्य पक्षनेतृत्वपदासाठी मतदान करणार आहेत. त्यातून पक्षनेतृत्वापदी निवड झालेली व्यक्ती विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची उत्तराधिकारी असेल. ‘द टाइम्स’साठी ‘यूगोव्ह’ या प्रख्यात विश्लेषक संस्थेने पाच दिवस सर्वेक्षण केले. त्याच्या निष्कर्षांनुसार ट्रुस या सुनक यांच्यापेक्षा जवळपास ३८ टक्क्यांनी आघाडीवर आहेत. विद्यमान परराष्ट्रमंत्री ट्रुस यांना सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६९ टक्के पक्षसदस्यांनी पाठिंबा दिला, तर ३१ टक्के पक्षसदस्य सुनक यांच्या बाजूने आहेत. २० जुलै रोजी ‘यूगोव्ह’ने केलेल्या सर्वेक्षणात ट्रुस यांना ६२ टक्के समर्थन मिळाले होते, तर ३८ टक्के पक्षसदस्य सुनक यांच्या बाजूने होते.
‘यूगोव्ह’ने स्पष्ट केले, की पंतप्रधानपदासाठीच्या स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात काँझव्र्हेटिव्ह पक्षाचे २१ टक्के सदस्य कसे आणि कोणाला मतदान करायचे हे ठरवू शकले नाहीत. हा आकडा आता १३ टक्क्यांवर आला असून, याचा सर्वाधिक फायदा ट्रुस यांना होताना दिसत आहे. ट्रस यांचे समर्थन करणाऱ्या ८३ टक्के सदस्यांनी सांगितले, की ते आपल्या समर्थनावर ठाम आहेत. १७ टक्क्यांनी आपले मत बदलू शकेल, असे सांगितले.
६० टक्के विरुद्ध २६ टक्के
‘द टाइम्स’च्या वृत्तानुसार काँझव्र्हेटिव्ह पक्षाच्या ६० टक्के सदस्यांनी ट्रुस यांना मतदान करणार असल्याचे सांगितले. तर २६ टक्के सदस्यांनी सुनक यांना पाठिंबा दिला. बाकीच्यांचा पाठिंबा अद्याप निश्चित व्हायचा आहे. सर्व वयोगटांत आणि देशाच्या विविध भागांत ट्रुस सुनक यांच्या पुढे असल्याचे सर्वेक्षण दर्शवते. सुनक यांना फक्त एकाच श्रेणीत ट्रुस यांच्यावर आघाडी मिळाली आहे. ही श्रेणी २०१६ मध्ये ब्रिटनच्या युरोपीय संघात (युरोपीयन युनियन) राहण्यास पाठिंबा देणाऱ्या पक्ष सदस्यांची आहे. मात्र, विरोधाभास हा आहे, की सुनक यांनी ‘ब्रेक्झिट’चे (युरोपियन युनियनमधून बाहेर पडणे) समर्थन केले होते. तर ट्रुस यांनी युरोपीय संघात राहण्यास पाठिंबा दिला होता.