इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Launch Vehicle (SSLV) असं या नव्या प्रक्षेपकाचे नाव असून कमी वजनाचे उपग्रह, ५०० किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. हा नवा प्रक्षेपक एका उड्डाणात एकुण ५०० किलो वजनाचे उपग्रह ५०० किलोमीटर उंचीपर्यंत प्रक्षेपित करु शकणार आहे. यामुळे मिनी, मायक्रो आणि नॅनो उपग्रह प्रक्षेपित करणे शक्य होणार आहे.

SSLV प्रक्षेपक का महत्त्वाचा?

इस्त्रोकडे जगातील विविध देश छोटे उपग्रह प्रक्षेपणासाठी सध्या रांगा लावून बसले आहेत. हे छोटे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी आकाराने मोठा, २९० टन वजनाचा polar satellite launch vehicle (PSLV) प्रक्षेपक सज्ज करावा लागतो. इस्त्रोचा हा भरवशाचा प्रक्षेपक ५०० किलोमीटर उंचीपर्यंत २००० पेक्षा जास्त किलोग्रॅम वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करु शकतो. मात्र हा प्रक्षेपक सज्ज कऱण्यासाठी ६०० कर्मचाऱ्यांना काही महिने आधी तयारी करावी लागते. मात्र इस्त्रोचा अवघ्या १०० टन वजनाचा SSLV हा नवा प्रक्षेपक फक्त सहा जणांची टीम अवघ्या सात दिवसांत उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज करु शकते. यामुळे SSLV प्रक्षेपणाच्या माध्यमातून इस्त्रोची मनुष्यबळ आणि पैशांची मोठी बचत होणार आहे.

SSLV पहिले प्रक्षेपण केव्हा?

SSLV प्रक्षेपकाची उंची ३४ मीटर असून व्यास दोन मीटर एवढा आहे. येत्या सात ऑगस्टला SSLVचे पहिले प्रक्षेपण सकाळी नऊ वाजून १८ मिनीटांनी श्रीहरीकोटा इथून होणार आहे. SSLV चे पहिले उड्डाण असल्याने हे प्रायोगिक उड्डाण असणार आहे, या मोहिमेला इस्त्रोने SSLV-D1 असं नाव दिलं आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून १३५ किलोग्रॅम वजनाचा EOS 02 नावाचा मायक्रो सॅटेलाईट ३५० किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित केला जाणार आहे. या उपग्रहाचा कार्यकाल हा १० महिने निश्चित करण्यात आला असून जमिनीची छायाचित्रे काढण्याचे काम करणार आहे. तर ग्रामीण भागातील ७५० विद्यार्थ्यांनींनी बनवलेला आठ किलोग्रॅम वजनाचा AzaadiSAT नावाचा उपग्रहही प्रक्षेपित केला जाणार आहे.

या नव्या प्रक्षेपकाचे प्रक्षेपण अनुभवण्यासाठी इस्त्रोने प्रेक्षक गॅलरी खुली केली असून इच्छुक नागरीकांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. या नव्या प्रक्षेपकाच्या माध्यमातून उपग्रह प्रक्षेपणाचा एक नवा आणि सोपा पर्याय इस्त्रोसाठी उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.