शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीच्या प्रवेश शुल्काबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यानुसार आगामी अकरावी प्रवेशाच्या शुल्कात 15 टक्के कपात करण्यात येणार आहे. 15 टक्के प्रवेश शुल्क सवलतीबाबत शिक्षण विभागाकडूनच निर्णय जाहीर करण्यात आलाय. या निर्णयानुसार अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील अनुदानित आणि विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या शुल्कात विद्यार्थ्यांना ही सूट मिळणार आहे. या प्रवेश शुल्कातील कपातीमुळे विद्यार्थी-पालकांना दिलासा मिळालाय.
ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रवेश प्रक्रियांमध्ये राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी कपात केलेल्या शुल्कानुसार शुल्क घ्यायचे आहे. त्यामुळे आगामी काळात या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते याकडेही लक्ष असणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी सरकारचा निर्णय झालेला असतानाही विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क घेण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी आल्यात. त्यामुळे अकरावीसाठीचा निर्णय कसा लागू होतो हे महत्त्वाचं ठरणार आहे.
पहिल्या फेरीत पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडमधल्या (Pimpri Chinchwad) 22 हजार 665 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंती क्रमांकाचे महाविद्यालय जाहीर झाले आहे. या विद्यार्थ्यांना आता आज संध्याकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आपला प्रवेश निश्चित करणं बंधनकारक असणार आहे. आतापर्यंत पहिल्या फेरीत जाहीर झालेल्या 38 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी 29 हजार 263 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. अजूनही 9 ते 10 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. आज संध्याकाळपर्यंत या विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील अशी शक्यता अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या सचिवांनी व्यक्त केली आहे.
राखीव गटातल्या विद्यार्थ्यांनी आरक्षण गटातून प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांना संबंधित प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी 30 दिवसांच्या आत जातीचं प्रमाणपत्र सादर करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला आहे, त्यांनी अर्जाची पोचपावती आणि सोबत वडिलांचं जात प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे स्वतःचं जात प्रमाणपत्र किंवा अर्जाची पोचपावती नाही, त्यांनी वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 30 दिवसांच्या आता आपलं जात प्रमाणपत्र सादर केलं नाही, त्यांचा प्रवेश रद्दा केला जाणार आहे.
यापूर्वी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली होती. ती वाढवून आता 30 दिवस करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश निश्चिती करताना सुरूवातीला नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पावती सादर करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. पण त्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याचं लक्षात आल्यानंतर आता पालकांना 30 दिवसांच्या आत नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करू या आशयाच्या हमीपत्रावरही प्रवेश दिला जाणार आहे.