रामराजे नाईक – निंबाळकर यांचे
विधानमंडळात ध्यानयोग शिबीरात प्रतिपादन
कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या संकटकाळात सर्वजण मोठ्या तणावातून स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत.या लढाईचा सामना करण्यासाठी , भारतीय संस्कृतीमधिल विविध योगसाधनेच्या माध्यमातून तणावमुक्त जीवन कसे जगता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि यामाध्यमातून तणावमुक्त जीवन जगणे शक्य आहे ,असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी मंगळवारी येथे केले.
विधानमंडळात वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र ,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी – कर्मचारी कल्याण केंद्र आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सदगुरु श्री शिवकृपानंद स्वामी यांच्या उपस्थितीत समर्पण ध्यान योग शिबीर झाले.विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे , विधीमंडळाचे सदस्य ,विधान मंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत ,विधानमंडळातील अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
सद्गुरु शिवकृपानंद स्वामी म्हणाले की, जनकल्याणासोबतच आत्मकल्याणाचा विचार करावा.स्वतःसाठी काहितरी करण्याची भावना मनात ठेऊन रोज किमान ३० मिनीटे ध्यानयोग करावा.कामाचे नियोजन करुन निस्वार्थ भावनेने कार्य करावे.त्यामुळे समाधान मिळते.योगध्यान मार्ग हा मनुष्य मनुष्याशी जोडण्यासाठी उत्तम मार्ग आहे.त्यातून भेदभाव कमी होतात.ध्यानयोग करतांना अंतर्मुख व्हावे.त्यामुळे आत्मविश्वास ही वाढतो , असे स्वामी पुढे म्हणाले.