ऑगस्टमध्ये सुरुवातीला राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचे दर वाढले असून याच्या झळा ग्राहकांना आजही सहन कराव्या लागत आहेत. मात्र या वर्षी कांदा दराने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सध्या घाऊक बाजारात कांदा प्रतिकिलो ९ ते १५ रुपये आहे.
गेल्या वर्षी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यात भिजलेला कांदा बांजारात येत असल्याने त्याच्या दरावर परिणाम होत ऑगस्टमध्ये प्रतिकिलोच दर २० ते २५ रुपयांवर गेले होते.
गेल्या वर्षी पावसाळी कांदा पीक काढणीच्या काळात मोठा पाऊस झाल्याने कांदा पिकाला फटका बसला होता. परिणामी, उत्पादनही कमी झाले होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये कांद्याचे घाऊक दर २० ते २५ रुपयांवर गेले होते. मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात कांदाचे दर वाढत असल्याचे दिसत आहे. अनेकदा या काळात कांदा दराने शंभरीदेखील गाठली आहे. यामुळे आता ग्राहक मे महिन्यात कांदा खरेदी करून साठवणूक करीत आहेत. मात्र या वर्षी कांदा दरात ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. महिन्याभरापासून कांद्याचे दर प्रतिकिलो १५ रुपयांपर्यंत स्थिरावलेले आहेत. दरात वाढ होईल अशी शक्यता होती, परंतु अद्याप कांदा आवक सुरळीत असून ७१ गाडी आवक होत आहे.
किरकोळ बाजारात लूट एपीएमसी घाऊक बाजारात कांदा दर स्थिर असताना किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांची लूट सुरू आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो ९ ते १५ रुपयांवर असलेला कांदा किरकोळ बाजारात मात्र प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांवर विक्री होत आहे.