तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडत असतील आणि जगात बदल घडवून आणण्याची उर्मी तुमच्यात असेल तर ही बातमी खास तुमच्याचसाठी आहे. कारण ‘जग बदलणारे ग्रंथ’ आता तुम्ही फक्त ऐकू शकणार आहात. ‘स्टोरीटेल मराठी’ या अॅपवर. दीपा देशमुख यांची पुस्तकं आता स्टोरीटेलवर ऐकायला मिळणार आहेत. त्याविषयी जाणून घेऊयात…
‘स्टोरीटेल मराठी’ सदैव अनमोल दुर्मिळ साहित्य संपदा आपल्या ऑडिओबुक्स’च्या माध्यमातून प्रकाशित करीत असते. प्रख्यात लेखिका दीपा देशमुख यांचा ‘जग बदलणारे ग्रंथ’ हा अत्यंत वेगळा ग्रंथ ‘स्टोरीटेल मराठी’वर प्रकाशित होत आहे. या ग्रंथांमधील दर आठवड्याला एक लेख याप्रमाणे ते वर्षभर रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. लेखिका दीपा देशमुख यांनी सुचविलेले मूळ ५० निवडक ग्रंथ प्रत्येकाने अखंड ऐकावेत असे असले तरी ज्यांना तितका वेळ नाही ते पंधरा ते वीस मिनिटे ऐकून मूळ ग्रंथाची ओळख थोडक्यात करून घेऊ शकतात. जानेवारी महिन्यात यातील ६ ग्रंथावरील लेखमाला रसिकांना ऐकायला मिळणार असून लेखिका दीपा देशमुख, अमोघ चंदन, सचिन सुरेश, अस्मिता दाभोळे यांच्या आवाजात पहिल्या ६ ग्रंथांचा रंजक परिचय ऐकता येणार आहे.
ग्रंथ कधी माणसाचं रूप घेतात तर कधी निसर्ग बनून दर्शन देतात. कधी हेच ग्रंथ परिस्थिती बनून समोर येतात आणि आपल्याला सशक्त, सजग आणि सुजाण बनवतात. चांगली पुस्तके एकाच वाचनात संपत नाहीत असे स्टीफन किंग म्हणतो. म.जोतिबा फुले यांनी ग्रंथाचे महत्व विशद केलं, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तक आणि भाकरी यांपैकी एकाची निवड करायची वेळ आली तर मी भाकरीऐवजी पुस्तकाची निवड करेन असं सांगितलं. खरं तर आपल्याकडून कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करणारे, आपला राग, लोभ, मत्सर न करणारे, तरीही भरभरून देणारे ग्रंथ आपले जिवलग मित्र आहेत, असं मला वाटतं. म्हणूनच आपलं जगणं अर्थपूर्ण आणि समृध्द करण्यासाठी या ग्रंथांशी दोस्ती करायलाच हवी. जरूर ऐका ‘जग बदलणारे’ ग्रंथ!’, दीपा देशमुख म्हणाल्या आहेत.
‘माणसाची प्रगती होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. चाकाचा शोध लागला आणि त्याच्या जगण्याला गती मिळाली. विज्ञान आणि शोधांनी माणसाला डोळस बनवलं. कलेनं त्याचं आयुष्य सुंदर केलं. औद्योगिक क्रांती झाली आणि त्याच्या आयुष्यानं वेगळी वाट पकडली. तंत्रज्ञानानं त्याच्या आयुष्यात खूप मोठी जागा व्यापली आणि त्याचं आयुष्य सुखकर केलं. माणसाच्या वाटचालीत स्त्रीवर लादलेलं दुय्यमत्व झुगारण्यासाठी तिनं संघर्ष केला आणि आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी ठाम भूमिका घेतली.
सृष्टीच्या या अफाट पसाऱ्यात माणसाची मग एक एक गोष्ट नीट समजून घेण्याची धडपड सुरू झाली, कधी त्यानं विज्ञानाची साथ घेतली, तर कधी तंत्रज्ञानाची मदत घेतली. कधी त्यानं स्वत:ला समजून घेण्यासाठी मानसशास्त्राची शाखा निर्माण केली. कधी त्यानं व्यवहार सुरळीत चालण्यासाठी अर्थशास्त्राची सोबत घेतली. कधी त्यानं आपली मूल्यं विकसित करताना त्यांना तत्त्वज्ञानाची जोड दिली. या सगळ्या गोष्टींचा दस्तावेज ‘ग्रंथ’ रुपात जतन करण्याची प्रक्रिया त्यानं सुरू ठेवली.’, असं दीपा देशमुख म्हणाल्यात.