ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि त्यांची वाग्दत्त वधू कॅरी सायमंडस विवाहबद्ध झाल्याची माहिती समोर येत आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा विवाहसोहळा अत्यंत गुप्तपणे पार पडला. मोजक्याच जणांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वीच ‘द सन’ या इंग्रजी वृत्तपत्राने बोरिस जॉन्सन आणि कॅरी सायमंडस विवाहबद्ध होणार असल्याचे वृत्त दिले होते. मात्र, ते पुढील वर्षी लग्नगाठ बांधतील, असे सांगितले जात होते. परंतु, या सगळ्यांना चकवा देत बोरिस जॉन्सन यांनी गुपचूप आपले लग्न उरकून घेतले आहे.
56 वर्षीय बोरिस जॉन्सन पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या 33 वर्षांच्या गर्लफ्रेंडसह डाऊनिंग स्ट्रीट येथे राहत आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये बोरिस जॉन्सन आणि कॅरी सायमंडस यांचा साखरपुडा झाला होता.
गेल्याचवर्षी या दोघांना मुलगा झाला असून त्याचे नाव विल्फ्रेड लॉरी निकोलस जॉन्सन ठेवण्यात आले आहे. यापूर्वी जॉन्सन यांनी दोनवेळा लग्न केले होते. मात्र, हे दोन्ही संसार फारकाळ टिकले नव्हते. त्यानंतर आता बोरिस जॉन्सन कॅरी सायमंडस यांच्यासोबत संसाराच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत.
कॅरी सायमंडस या ‘इंडिपेंडंट’ दैनिकाच्या संस्थापक मॅथ्यू सायमंडस आणि वकील जोसेफिन मॅकफी या दाम्पत्याची कन्या आहेत. 33 वर्षांच्या कॅरी यांचे बालपण लंडनमध्येच गेले आहे. त्यांनी वार्विक विद्यापीठातून कला, इतिहास आणि नाटकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. कॅरी यांनी खासदार जॅक गोल्थस्मिथ यांच्यासोबत राजकीय क्षेत्रात कामाला सुरुवात केली होती.