आयपीएलने भारतातल्या युवा खेळाडूंना एक व्यासपीठ दिलं आहे, जिथं या खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळतेय. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी आपली छाप उमटवली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू अनुज रावत यापैकीच एक खेळाडू.
शेतकरी कुटुंबातून आलेला अनुज आज विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिससारख्या दिग्गजांसह फलंदाजी करून आयपीएलमध्ये नाव कमवत आहे.
22 वर्षांचा अनुज रावत हा मुळचा नैनितालजळवच्या रामनगर इथला राहणार आहे, इथेच त्याच्या वडिलांची शेती आहे. लहानपणापासून क्रिकेटची आवड असलेला असून शेतातच क्रिकेट खेळायचा. ऑस्ट्रेलियन विकेटकिपर अॅडम गिलख्रिस्ट हा त्याचा आवडता खेळाडू. अनुजला ग्रिलख्रिस्टसारखं बनायचं होतं. त्याचा खेळ बघून मित्रांनी त्याला यष्टीरक्षक होण्याचा सल्ला दिला.
अनुजच्या वडिलांनाही क्रिकेटची आवड होती. आपल्या मुलाला चांगले प्रशिक्षण मिळावं यासाठी त्यांनी अनुजला दिल्लीत पाठवण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत, अनुजने राजकुमार शर्मा यांच्या दिल्ली क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण सुरू केलं, ज्या क्रिकेट अकादमीने देशाला कोहलीसारखा फलंदाज दिला. तिथूनच अनुजचाही क्रिकेट प्रवास सुरू झाला.
अनुजची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. अनुजला पहिल्यांदा रणजी ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली तेव्हा त्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली होती. पण अशा परिस्थितीतही त्याने 74 धावा केल्या होत्या. त्याचा खेळ बघून त्याला अंडर-19 आशिया कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी स्थानिक क्रिकेटमध्ये अनुज रावतने बाऊंड्री हिटर म्हणून ओळख निर्माण केली होती. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात खेळाडूंच्या लिलावात आरसीबी टीम मॅनेजमेंट फाफ डू प्लेसिससह डाव्या हाताच्या फलंदाजाच्या शोधात होते. माईक हसन आणि संजय बांगर यांनी अनुज रावतवर तब्बल 3.4 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतलं. आज अनुज रावत आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू बनला आहे.
आयपीएल महत्वाच्या घटना जाणून घ्या येथे : https://upscgoal.com/ipl-2022-fact/