लोकप्रिय इंस्टाग्राम या अॕपमध्ये असलेली उणीव सोलापूरच्या एका पठ्ठ्याने फेसबूकच्या लक्षात आणून दिली. यासाठी त्याला फेसबूकने 22 लाख रुपयाचं बक्षिस दिलं.
सोलापुरातील या तरुणाचं मयूर फरताडे असं नाव आहे. इंस्टाग्राममध्ये असलेल्या उणीवेमुळे कोणीही कोणालाही फॉलो न आकाईव पोस्ट, स्टोरी, रिल्स आणि IGTV पाहू शकत होता. ही बाब मयूरच्या निदर्शनास आली. मयूरने सी ++, पायथन याचं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे मयूरला इंस्टाग्राममध्ये असलेली उणीव लक्षात आली.
इंस्टाग्रामच्या या उणीवेमुळे हॅकर्स इंस्टाग्राम युझर्सचे खासगी फोटो, व्हीडिओ यासारखा महत्वूपूर्ण डेटा हॅक करणं शक्य होतं. युझर्सची सर्व माहिती गोळा करुन तो याद्वारे फेसबूकही अकाऊंटही हॅक करु शकतो. मयूरने यासंदर्भातील सर्व माहिती फेसबूकला दिली.
मयूरने इंस्टाग्राम बगचा खुलासा फेसबूकच्या बिग बाऊंटी प्रोग्रामादरम्यान 16 एप्रिलला केला. यानंतर फेसबूककडून 19 एप्रिलला मयूरसोबत संपर्क साधण्यात आला. याद्वारे फेसबूकने मयूरला या संदर्भात अधिक माहिती देण्याची विनंती केली. मयूरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, फेसबूकने इंस्टाग्राममध्ये आवश्यक सर्व ते बदल केले. मयूरने सांगितलेल्या या उणिवांसाठी फेसबूकने त्याला 12 जूनला 22 लाख रुपयांचं बक्षिस दिलं.
मयूरने सांगितलेल्या या उणिवेमुळे अनेक युझर्सचा डेटा सेफ झाला आहे. मयूरने दिलेल्या या महत्वपूर्ण दुरुस्तीसाठी फेसबूकने त्याचे आभार मानले आहेत. तसेच भविष्यातही आपल्याकडून अशाच प्रकारे दुरुस्त्या अपेक्षित असल्याचं सांगितलं.
मयूर कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे. मयूर फक्त 21 वर्षांचा आहे. मयूरने याआधी शासनाच्या वेबसाईट्समध्ये असलेल्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत.