रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसामुळे नद्यांना पूर

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात गेले चार दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. या कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने नद्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी पुराचे पाणी वस्ती आणि शेतीत घुसले आहे. तर अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. तर सिंधुदुर्गात कणकवली येथील गड नदीला पूर आला आहे. रत्नागिरीतील गुहागरमध्येही पालशेत पुलही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये जोरदार पाऊस पडला. अंजनवेल इथल्या ओढ्यात मोठ्या प्रमाणात गाळ अडकल्याने पाण्याने प्रवाह बदलला. त्यामुळे तिथला पुल पाण्याखाली गेला. मुसळधार पावसामुळे अनेक गावातील छोट्या ओढ्यांवरील पूल पाण्याखाली गेले. 15 गावांना जोडणारा पालशेत पुलही पाण्याखाली गेला. पालशेत बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. पावसाचा जोर कमी झाल्यावर पुराचं पाणी ओसरले.

गेल्या 24 तासात दापोली तालुक्यात मुसळधार पाऊस पडला असून त्याचा फटका दापोली तालुक्यातील आंजर्ले गावाला बसलाय गावातील सर्वच रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी साचले असून सर्वत्र रस्त्यांना पाणीच पाणी दिसत आहे. मात्र गावातील नालेसफाई योग्य रीतीने न झाल्यामुळे गावात सगळीकडेच पाणी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. आंजर्ले आडे रस्ता आंजर्ले ग्रामपंचायत कडे जाण्याचा मार्ग व अन्य गल्या ह्या जलमय झाल्या आहेत.

तर सिंधुदुर्गातही अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आला आहे. 27 गावांचा संपर्कही तुटला आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजाला 5 दिवस हुलकावणी देणार्या पावसाने आज रायगड जिल्हयात हजेरी लावली. जिल्ह्याच्या काही भागात पावसाची संततधार तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धनमध्ये पावसाचा जोर अधिक होता.

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.