मुंबई अनलॉक करणे घातक ठरू शकते..

येत्या 1 जूनपासून लॉकडाऊन उठवला जाणार का, याकडे संपूर्ण राज्यातील नागरिक डोळे लावून बसले असताना आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यामुळे मुंबईतील लॉकडाऊन (Lockdown) आणखी काही काळ लांबण्याचे संकेत मिळत आहेत.

अस्लम शेख बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हे भाष्य केले. मुंबईतील 50 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत लॉकडाऊन उठवणे हे म्हणजे कोरोनाला पुन्हा आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे मुंबईतील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवणे गरजेचे आहे. सलून, हार्डवेअर आणि इतर अत्यावश्यक गोष्टींची दुकाने सुरुवातीला उघडावीत. त्यानंतर बाकीची दुकाने आणि इतर दैनंदिन व्यवहार सुरु व्हावेत, असे मत अस्लम शेख यांनी मांडले.

छत्र्या, ताडपत्री, रेनकोटची दुकाने उघडता येणार
राज्य सरकारने छत्र्या, ताडपत्री आणि रेनकोटची दुकाने उघडण्यासही परवानगी दिली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात घरांची शाकारणी, त्याचप्रमाणे शहरी भागात गळती असणाऱ्या ठिकाणी ताडपत्री लावून बंदोबस्त करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या दुकानांचा अत्यावश्यक दुकानांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

येत्या 1 जुनपासून पुण्यात सरसकट अनलॉक करु नका, अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता एकाच झटक्यात सर्वकाही अनलॉक (Unlock) करणे योग्य ठरणार नाही. सर्व दुकाने एकाचवेळी उघडण्यास परवानगी देता कामा नये, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केले. दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता पुण्यात सरसकट अनलॉक योग्य ठरणार नाही. येत्या शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत आपण ही भूमिका मांडू, असे मोहोळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.