sdnewsonline मध्ये आपण सर्वांचे स्वागत.
नमस्कार
रेमडेसिवीरमुळे मृत्यू टाळता
येईल असा कोणताही आधार नाही
राज्यात अँक्टिव्ह रुग्ण वाढत असताना रोज केवळ ५० हजार रेमडेसिवीर उपलब्ध होत असून ते प्रत्येक जिल्ह्यातील अँक्टिव्ह रुग्णांच्या प्रमाणात त्याचे वाटप केले जाते असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सांगितले. एकूणच रेमडेसिवीरचा कोरोना रुग्णांच्या उपचारातील उपयोगाविषयी राज्य कृती दलाचे सदस्य व मुलुंड येथील फोर्टिज रुग्णालयातील डॉक्टर राहुल पंडित यांना विचारले असता, रेमडेसिवीरच्या वापरामुळे मृत्यू टाळता येईल असा कोणताही आधार आजवरच्या अभ्यासात आढळून आला नसल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णाचा रुग्णालयातील वा अतिदक्षता विभागातील कालावधी एक ते तीन दिवस कमी करण्यास याची मदत होते असेही त्यांनी सांगितले.
काश्मिर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा ज्वलंत प्रश्न असलेल्या काश्मिर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची गोपनीय बैठक जानेवारीमध्ये दुबईत झाल्याचे वृत्त आहे. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताकडून करण्यात आलेल्या हवाई कारवाईनंतर दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगते आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष
शरद पवार यांना डिस्चार्ज
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ११ एप्रिल रोजी शरद पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. १२ एप्रिल रोजी त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेतल्यानंतर आज शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची तब्येत बरी आहे. देशभरातील जनतेने, चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या शिवाय दिलेल्या पाठिंब्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांचे आभार मानले आहेत
दिल्लीत पंचतारांकित
हॉटेलमध्येही कोरोनाचे उपचार
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी दिल्ली सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून दिल्लीत आता पंचतारांकित हॉटेलमध्येसुद्धा कोरोनाचे उपचार केले जाणार आहेत. तसा आदेश दिल्लीच्या आरोग्य सचिवांनी खासगी रुग्णालयांना दिले आहेत. पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रतिदिन पाच हजार रुपये आणि चार तारांकित हॉटेलमध्ये प्रतिदिन चार हजार रुपये शुल्क अदा केले जाणार आहेत.
एसएससी बोर्ड दहावीच्या
परीक्षा रद्द करणार का…?
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता एसएससी बोर्ड दहावीच्या परीक्षा रद्द करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर अंतर्गत मूल्यमापन आणि गुणप्रदान करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. याच धर्तीवर एसएससी बोर्डाची दहावीची परीक्षा घेता येईल का, तज्ज्ञांशी बोलून घेतला जाईल, असे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मला चंपा’ म्हणू
नका : चंद्रकांत पाटील
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा ‘चंपा’ उल्लेख करण्यावरुन आक्षेप नोंदवत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना इशारा दिला आहे. अजित पवार यांनी पंढरपुरात सभेत बोलताना पुन्हा एकदा ‘चंपा’असा उल्लेख करत चंद्रकांत पाटील यांना डिवचलं होतं. अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो असा टोला त्यांनी लगावला होता. यावरुन चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. अजित पवारांना मला एक इशारा द्यायचा आहे. खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. मी बोलायला लागलो तर महागात पडेन.
..तर अत्यावश्यक सेवाही
बंद कराव्यात : मुख्यमंत्री
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी-पोलीस प्रशासनाला दिले.
दररोज नव्यानं ७ हजार टन ऑक्सीजन
निर्माण करण्याची क्षमता
वैद्यकीय उपचारासाठी प्राणवायूचा पुरवठा कमी पडणार नाही अशी ग्वाही केंद्र सरकारने दिली आहे. सध्या देशात ५० हजार टनांपेक्षा जास्त ऑक्सीजन साठा असून दररोज नव्यानं ७ हजार टन निर्माण करण्याची क्षमता असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्यसरकारांनी तारतम्यानं त्याचा वापर करावा आणि अपव्यय टाळावा तसंच जिल्हावार पुरवठा करण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करावं, असंही आवाहनही केंद्रसरकारनं केलं आहे.
गरीब व दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या
काळात अर्थसहाय करण्यास परवानगी द्या
राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाई मार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब व दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिली आहेत. ऑक्सिजनविषयी मुख्यमंत्री म्हणतात की, राज्यात मोठ्या प्रमाणावर कोविडच्या चाचण्या होत असून रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत.
जिल्हा परिषदांसाठी
१,४५६ कोटी रुपयांचा निधी
राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून आणखी १, ४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंध (टाईड) निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून तेथून तत्काळ पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या निधीचा वापर करुन गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पीएम केअर्स एक उत्सवाचे
ढोंग : राहुल गांधी
अनेक ठिकाणा रूग्णालयांमध्ये बेड्स, व्हेंटिलटर्स, ऑक्सिजनसह लस व इंजेक्शनचा देखील तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. लसीकरणासाठी नागरिकांना लसीकरण केंद्राबाहेर दिवसदिवस रांगेत उभा राहावं लागत आहे. तर, पंतप्रधान मोदींनी देशभरात लस महोत्सव साजरा करण्याचे राज्यांना आवाहन केल होतं. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी जोरदार टीका केली आहे. शिवाय, पीएम केअर्स फंडबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे.
ना चाचण्या , ना रूग्णालयात बेड, ना व्हेंटिलेटर्स, ना ऑक्सिजन, लस देखील नाही. केवळ एक उत्सवाचे ढोंग आहे. पीएम केअर्स ?” असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.
वैद्यकीय परीक्षा जूनपर्यंत
पुढे ढकलण्यात आल्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील ७२ तासांत निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येणार आहे.
भाजपा नेते आशिष शेलार यांना कोरोना
राज्यात कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढतच असून अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं असतानाच आता भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
पाकिस्तानला लष्करी
प्रत्युत्तराची शक्यता जास्त
भारत व पाकिस्तान यांच्यात सरधोपट युद्ध होण्याची शक्यता नसली, तरी दोन्ही देशांमधील संकटे अधिक तीव्र झाल्याने ती चिघळण्याचे चक्र सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स (ओडीएन) कार्यालयाने सादर केलेल्या ‘थ्रेट अॅसेसमेंट रिपोर्ट’मध्ये नमूद केले आहे.
मरकझला परवानगी नाकारली
निझामुद्दीन मरकझमध्ये भाविकांना प्रवेश देण्याबाबत सहमती दर्शवणाऱ्या केंद्र सरकारने दुसऱ्याच दिवशी घूमजाव करीत मशिदीमध्ये कोणालाही कोणत्याही कार्यक्रमास मुभा दिली जाऊ शकत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयापुढे स्पष्ट केले. नमाज अदा करण्यावर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करून भाविकांना ‘मरकझ’मध्ये प्रवेश मिळावा, अशी मागणी करणाऱ्या दिल्ली वक्फ मंडळाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
कोरोनामुळे पतीचं निधन;
पत्नीची मुलासह आत्महत्या
पतीचं कोरोनामुळे निधन झाल्याची माहिती मिळताच पत्नीने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. नांदेडच्या लोह शहरात ही घटना घडली आहे. महिलेने दोन्ही मुलींना घरी ठेवून तीन वर्षांच्या मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. आई-वडिलांविना मुली पोरक्या झाल्या आहेत.
कोरोना संसर्गामुळे
१०१ पोलिसांचा मृत्यू
मुंबईत एका आठवड्यात २७९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचवेळी, कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत १०१ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. मुंबईतील सुमारे ७० टक्के पोलिसांना कोरोना ही लस मिळाली असली तरीही मोठ्या संख्येने पोलिसांना कोरोनाची लागण होत आहे.
विरोधी पक्षनेते पद तरी
पाच वर्षे टिकून राहील का ?
भाजपकडे आता कार्यकर्त्यांची अत्यंत कमतरता आहे. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नसल्याने अनेकजण महाविकास आघाडीची वाट धरत आहे. हे चित्र पाहता देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का ? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. मंगळवेढा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
SD Social Media
9850 60 3590