कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लसीकरणावर भर दिला जात आहे. देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम राबवली जात आहे. राज्यात 21 जूनपासून 18 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. त्यामुळे काही लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी झाल्याचं चित्र आहे.
औरंगाबादच्या वाळूजमध्ये लसीकरण केंद्रावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणार गर्दी केली. त्यामुळे धक्काबुक्की झाली आणि चेंगराचेंगरी सारखा प्रकार घडला. यात काही लोकांना किरकोळ इजा सुद्धा झाली. लसीकरण केंद्रावर पोलीस बंदोबस्त सुद्धा होता. पण पोलिसांनाही गर्दी हाताळता आली नाही. हा रोजचाच प्रकार असल्याचं लोक सांगताय.
लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होतेय, त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवल्याचं चित्र पाहिला मिळतंय. त्यातच लसीच्या तुटवड्यामुळे मोठा गोंधळ उडाला. टोकन वाटून लस देण्याचं काम प्रत्येक केंद्रावर सुरू आहे. पण लस संपल्यामुळे नागरिकांनी परत घरी जाण्याची वेळ आली आहे. हजारोंची गर्दी झालेल्या या लसीकरण केंद्रावर फक्त 70 लसी शिल्लक होत्या. लस उपलब्ध झाल्यावर पुन्हा लसीकरण सुरु केलं जाईल अशी माहिती इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली.