महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा केली. 30 एप्रिल पर्यंत लागू करण्यात आलेला लाॅकडाऊन काल मुख्यमंत्र्यांनी 15 मे पर्यंत वाढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यातच आता कोरोना कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मे महिन्याच्या अखेरीस कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरेल, असा अंदाज काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मे महिन्यामध्ये भारतात 14 ते 18 तारखेदरम्यान कोरोना रुग्णसंख्या ही सर्वोच्च उच्चांक गाठेल आणि त्यानंतर, तिसऱ्या आठवड्यापासून रुग्ण संख्या हळूहळू आटोक्यात येईल, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. पण पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असल्याचं दिसून येत आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे देशभरातील आरोग्यव्यवस्था कोलमडली असल्याचं समोर येत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नसल्याने उपचाराअभावी त्यांचा मृत्यू होत असल्याची गंभीर परिस्थिती ओढवली आहे.
भारतात सध्या लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच पुढील महिन्यापासून 18 वर्षांच्यावरील सर्व लोकांना कोरोना लस मिळणार आहे. आरोग्य व्यवस्थेमध्ये हळूहळू सुधारणा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यासंबंधी कोरोना कृती समितीचे सदस्य डॉ. सुभाष साळुंखे म्हणतात की, ‘दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत रुग्णसंख्या वेगाने वाढली. त्यानंतर, हा संसर्ग इतर राज्यांमध्ये गेला. पण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही रुग्णसंख्या नक्कीच आटोक्यात येईल आणि कोरोना आटोक्यात येण्यास महाराष्ट्रातूनच सुरुवात होईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.