घरात राहून, पिंजऱ्यात राहून
कोणी सत्ता चालवली नाही : राणे
महाडमध्ये नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले होते. नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर राणेंना जामीन मंजूर करण्यात आला होता. पुन्हा दोन दिवसानंतर आता जन आशीर्वाद यात्रा सुरु झाली आहे. दरम्यान, रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलतांना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली. घरात राहून, पिंजऱ्यात राहून कोणी सत्ता चालवली नाही, असे राणे म्हणाले
महाराष्ट्राला हे शोभणारे
आहे का : बाबा आढाव
राणे-शिवसेना संघर्ष, राणेंना अटक मग जामीन ह्या नाट्यमय घडामोडींवर कामगार नेते बाबा आढाव यांनी आपलं मत स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात आज जे काही चालले आहे. ते शोभणारे आहे का? एका थोबाडीत शब्दावरून किती चर्चा चालली आहे आणि इकडे काय चाललं आहे. मुख्यमंत्र्यांना एक सांगू इच्छितो, प्रकल्पांना विरोध का होतो? एक म्हणजे पर्यावरणाच्या अंगाने, तर दुसरे म्हणजे पुनर्वसनाच्या अंगाने होतो. तुम्ही पुनर्वसनाची योजना तरी दाखवा ना.पण तुम्ही एकच सांगता पैसे घ्या आणि गप्प बसा”.
ईडीची एकनाथ खडसे यांच्यावर
कारवाई ५ कोटीची मालमत्ता जप्त
भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. ईडीची एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई करत ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी ईडीकडून केली जात होती.
अकरावी प्रवेशाची पहिली
गुणवत्ता यादी जाहीर
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे. यंदा मुंबईतल्या नामाकिंत कॉलेजचा कट-ऑफ ९० टक्क्यांवर लागला आहे. मुंबई विभागात १ लाख १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत कॉलेज प्राप्त झालं आहे. तर ४८ हजार ७८८ विद्यार्थ्यांना आपल्या पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळालेलं आहे. जेवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी ६१ टक्के विद्यार्थ्यांना आता कॉलेजेस प्राप्त झाली आहेत.
खासगी कंपनीने तयार केलेला ग्रेनेड
भारतीय लष्कराला सुपूर्द
भारतातील एका खासगी कंपनीने प्रथमच ग्रेनेड तयार केले असून त्याची पहिली बॅच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय लष्कराला सुपूर्द करण्यात आली आहे. हे मल्टी-मोड हँड ग्रेनेड (MMHG) नागपूरमधील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेडने डीआरडीओच्या मदतीने तयार केले आहेत. भारतीय लष्करासाठी भारतात दारुगोळा तयार होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.
शेतात गांजा लागवडीची
परवानगी द्या : शेतकऱ्याचे पत्र
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना एका शेतकऱ्याने दोन एकरामध्ये गांजा लावण्यासंदर्भात परवानगी मागणारं पत्र लिहिलं आहे. अनिल आबाजी पाटील असं पत्र लिहिणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे राहणाऱ्या पाटील यांनी लिहिलेलं हे पत्र सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे. माझी शिरापूर येथे दोन एकर जमीन असून तिथे मला गांजा लागवडीची परवानगी द्यावी असं पाटील यांनी म्हटलं आहे.
उध्दव ठाकरे हे महाराष्ट्रातील
असहिष्णुतेचे जनक
ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उध्दव ठाकरे हे आहेत”, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार ॲड.आशिष शेलार यांनी रत्नागिरी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
नवज्योत सिंह सिद्धू यांचे सल्लागार
मालविंदर माली यांचा राजीनामा
पंजाब काँग्रेसमधील वाद शमण्याची चिन्हं दिसत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योत सिंह सिद्धू यांची वर्णी लागल्यानंतर प्रकरण शमेल अशी शक्यता होती. नवज्योत सिंह सिद्धू यांच्या सल्लागारावरून पंजाबमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी सिद्धू यांना सल्लागारांना पदावरून काढण्याची ताकीद दिली होती. त्यानंतर आज सिद्धू यांचे सल्लागार मालविंदर माली यांनी राजीनामा दिला.
१ जुलै पासून केंद्र कर्मचाऱ्यांना
वाढीव महागाई भत्ता मिळू लागला
१ जुलै २०२१ पासून केंद्र सरकारचे कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना वाढीव महागाई भत्ता (डीए) मिळू लागला.केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दीड वर्षांनंतर महागाई भत्ता आणि महागाई निवारण भत्ता मिळणे ही एक चांगली बातमी आहे, तरीही एक बाजू आहे ज्याबद्दल केंद्रीय कर्मचारी अजूनही निराश आहेत.
मराठा आरक्षण प्रश्नी खासदार
संभाजी छत्रपती राष्ट्रपतींना भेटणार
मराठा आरक्षणाचा चेंडू आता राष्ट्रपतींच्या दरबारात जाणार आहे. खासदार संभाजी छत्रपती सर्वपक्षीय खासदारांना घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत. येत्या 2 सप्टेंरब रोजी ही भेट होणार आहे. संभाजी छत्रपती यांनी ट्विट करून तशी माहिती दिली आहे. या भेटीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नागपुरात होम आयसोलेशन बंद,
डेल्टा प्लसचे रूग्ण वाढले
कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. दुसरी लाट ओसरत असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त करण्यात येतोय. अशातच राज्यात कोरोना रूग्णांची संख्या काही प्रमाणात वाढताना दिसतेय. राज्यात कोरोनाचा वेरिएंट डेल्टा प्लसचे रूग्ण सापडत आहेत. तर नागपूरात डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
केरळसह महाराष्ट्रात रात्रीच्या
संचारबंदीची केंद्राची सूचना
देशात पुन्हा कोरोनाची रुग्णवाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या रुग्णवाढीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. आता कोरोनाचा धोका वाढू नये म्हणून प्रथम रात्रीची संचारबंदी कडक करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. देशातील 41 जिल्ह्यांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोनाचा संसर्ग दर असल्याने केरळसह महाराष्ट्रात रात्रीच्या संचारबंदीची केंद्राची सूचना केली आहे. उत्तर प्रदेशातही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
काबूल विमानतळावर बॉम्बस्फोट,
13 अमेरिकन कमांडो शहीद
अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 13 अमेरिकन कमांडो शहीद झाले आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे. या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आमचे सैनिक आणि निरापराध नागरिक मारले गेले आहेत, याचे दु:ख आहे. या दु:खामुळे व्हाइट हाऊसवरील ध्वज अर्ध्यावर खाली आणला आहे. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी 13 यूएस कमांडोच्या मृत्यूबाबत दुजोरा दिला आहे.
भारतात तब्बल 61 करोड
लोकांचे लसीकरण
देशभरात कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येतोय. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, भारतात तब्बल 61 करोड लोकांना आतापर्यंत लस टोचण्यात आली आहे. तर गुरुवारी 68 लाख लसीचे डोस देण्यात आले.
SD social media
9850 60 3590