आरोपी नसतानाही माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांनाही अटकेची भीती वाटत आहे. त्यामुळेच ते कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याचं वकील इंदरपाल सिंग यांनी सांगितलं.
अनिल देशमुख यांचे वकील अॅड. इंदरपाल सिंग यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. देशमुख प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आणि हायकोर्टात खटला सुरू होता. तुम्ही आरोपी नाहीत. त्यामुळे तुम्ही चौकशीसाठी या असं प्रतिज्ञापत्रं ईडीने सर्वोच्च न्यायालयात सादर केलं होतं. त्यानंतर अनिल देशमुख हे स्वत:हून चौकशीला हजर झाले. मात्र, त्यांना अटक करण्यात आली. ते तुम्ही पाहत आहात. त्यामुळे ऋषिकेश देशमुख यांनाही आपल्याला अटक होऊ शकते याचे भान आहे. त्यामुळे ते कायदेशीर बाबी तपासून पाहत आहेत, असं इंदरपाल सिंग यांनी सांगितलं.
ऋषिकेश देशमुख आज कोर्टात येणार नाही. आम्ही अॅडर्जनमेंट फाईल करतोय आणि 15 दिवसांचा वेळ मागतोय. त्यांना लिगल रेमेडी शोधायची आहे. कलम 438 आणि 439 मध्ये काहीही असू शकते. दोन्ही लिगल रेमेडीज उपलब्ध आहेत. त्यामुळे ऋषिकेश हे अटक पूर्व जामिनासाठीही जाऊ शकतात. ते कोर्टाकडे दाद मागू शकता, असंही त्यांनी सांगितलं. कलम 438 आणि 439 नुसार अटक झाली तर जामिनासाठी अर्ज करता येतो आणि अटक झाली नसेल तर अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला जाऊ शकतो. तशी तरतूद आहे.
दरम्यान, देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर शुकशुकाट पसरला आहे. नागपुरातील सिव्हील लाईन्स येथे देशमुख यांचं घर आहे. मात्र, देशमुख ईडीच्या कोठडीत असल्याने भर दिवाळीत देशमुखांच्या निवासस्थानी शुकशुकाट होता. त्यांच्या घरी फक्त काम करणारे कर्मचारी होते. देशमुख यांच्या कुटुंबातील एकही सदस्य येथे उपस्थित नव्हते. राज्याचे माजी गृहमंत्री असल्यानं त्यांच्या घरासमोर पोलिसांची सुरक्षा लावण्यात आली आहे. वारंवार नोटीस बजावूनही ते न्यायालयात हजर झाले नव्हते. शेवटी काल ईडीसमोर हजर झाले. तेव्हापासून त्यांना अटक होण्याची शक्यता असल्यानं नागपुरातील निवासस्थानी कुणीही घरी दिसले नाही. कुटुंबातील व्यक्ती नागपुरातील घरी नसल्यानं त्यांचे कुटुंबीय दिवाळीचा उत्साह साजरा करू शकणार नाहीत, असं एकंदरित चित्र आहे.