पुणे शहरातील मनसेच्या फायरब्रँड नेत्या अशी ओळख असलेल्या रुपाली पाटील यांनी आता मनसेला अखेर जय महाराष्ट्र केला आहे. पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत त्याबाबत घोषणा केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येण्यापूर्वीच रुपाली पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानं मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. आता रुपाली पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, आता पाटील या हाती घड्याळ बांधणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित पाटील यांचा उद्या मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळतेय.
मनसेचा नेमका कोणत्या कारणांमुळे राजीनामा दिला, या प्रश्नाविषयी विचारले असता, रुपाली पाटील म्हणाल्या, ” मनसेत निःस्वार्थी, प्रचंड प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. मी या परिवारात बहीण म्हणून नेहमी त्यांच्यासोबत असेन. पण माझी खदखद मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवेन. पण मला न्याय देत असताना, लोकांना उत्तर देत असताना खंबीरपणे साथीची गरज असते. तिच मिळत नसेल तर कार करणे अवघड होते. याविषयीच्या भावना राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत. आता मला माझ्या गोष्टी परत परत सगळ्यांसमोर बोलून दाखवायच्या नाहीत. सन्माननीय राज ठाकरे माझे दैवत आहेत व राहतील.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील मी माझ्या सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पण जरी मी राजीनामा देत असले तरी तुम्ही माझ्या कायम हृदयात रहाल. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देतं. यापुढेही आपले आशीर्वाद रहावेत”, असं भावनिक पत्र रुपाली पाटील यांनी राज ठाकरे यांना लिहिलं आहे.
वसंत मोरेंची रुपाली ठोंबरेंवर खोचक टीका
रुपाली पाटलांनी राजकीय आत्महत्या केली आहे. मनसेला त्यांच्या जाण्यानं काही मोठं खिंडार पडलं नाही, अशी बोचरी टीका मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी केली आहे. पक्षातील रिकामटेकड्या नेत्यांकडून आपल्याला त्रास होतेय अशी टीका रुपाली पाटील- ठोंबरे यांनी केली होती, मात्र रिकामटेकडे कोण हे त्यांनी एकदा जाहीर करावं असेआव्हानही वसंत मोरे यांनी केले आहे.