‘…म्हणून महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर जात आहेत’, रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप

वेदांता-फॉक्सकॉन हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या सरकारवर टीका केली, तर सरकारने तत्कालिन महाविकासआघाडीच्या उदासिनतेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचा आरोप केला. वेदांता फॉक्सकॉननंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचा आरोप केला जात आहे. वेदांत-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्क योजनेलाही मुकावे लागले आहे. यावरुन रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका गुजरात आणि कर्नाटकनंतर आहेत. त्या राज्यातील विधानसभा निवडणुका असल्याने हे प्रकल्प तिकडे जात असल्याचं म्हणत आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. अप्रत्यक्षपणे भाजप निवडणुकांमधील विजयासाठी हे सगळं करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

वेदांतानंतर आता मेडीसिन डिव्हाईस पार्क प्रकल्प महाराष्ट्रातून गेला आहे. यावरून आमदार रोहित पवार यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.

विरोधकांच्या या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली की ‘मला त्यांना एक विचारायचे आहे, मेडिकल डिव्हाईस पार्क महाराष्ट्रात येणार होता, याचा एक चिठीवर पुरावा तरी तुम्ही दाखवणार का? मनात येईल ते बोलायचं अडीच वर्षे होते थोडे थोडके नव्हते. अडीच वर्षात काहीच केलं नाही, अडीच वर्ष केवळ केंद्र सरकारला शिव्या द्यायच्या एवढं एकमेव काम केलं आणि आता वाटेल ते मनात येईल ते बोलतात.’

दरम्यान PFI च्या पुण्यातील आंदोलनादरम्यान काहींनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप आहे. यावरुन सध्या बरंच राजकारण तापलं आहे. यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानबद्दल घोषणा दिल्या असतील तर त्या लोकांना लवकर पकडले पाहिजे. जे लोक यात नाहीत त्यांना चुकीच्या नजरेने पाहू नये. याचे राजकीय भांडवल करू नये, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.