एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, शिवसेनेमध्ये पुन्हा मोठं खिंडार
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट यांच्यात प्रचंड संघर्ष बघायला मिळाला. अखेर ही लढाई मुंबई हायकोर्टात गेली होती. कोर्टाने शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा खूप मोठा दिलासा मिळाला. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासूनची शिवसेनेसाठी ही सर्वात दिलासादायक बातमी मानली जात होती. ही घटना ताजी असतानाच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला पुन्हा आव्हान देण्यासाठी शिंदे गटाने डिवचलं आहे. शिवसेनेच्या पालघर जिल्हा प्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये आणि पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक जेष्ठ शिवसैनिकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला. त्यामुळे मुख्य शिवसेनेसाठी हा झटका मानला जातोय. एकनाथ शिंदे यांचा हे धक्कातंत्र असल्याचं मानलं जात आहे.
‘राज्याचा खरा मुख्यमंत्री कोण?’, आदित्य ठाकरेंचा तळेगावात आक्रोश
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुणे जिल्ह्यातील तळेगावात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वेदांता फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरेंनी तळेगावात आपल्या भाषणात प्रचंड आक्रोश केला. राज्याचा खरा मुख्यमंत्री नेमका कोण आहे हेच राज्याला अजून समजलेलं नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला खोके सरकार म्हणून पुन्हा एकदा हिणवलं. “मुख्यमंत्र्यांनी एक-दीड महिन्याआधी विचारलं असतं तर सांगितलं असतं की साहेब त्यांच्याकडेही 50 खोक्के पोहोचवा आणि एकदम ओक्के करा”, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, चार ते पाच तास वाहनं एकाच ठिकाणी अडकून पडले
मुंबई आणि ठाण्यात वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. विशेषत: मुंबई-नाशिक महामार्गावर असणारी वाहतूक कोंडीची समस्या ही जणूकाही पाचवीलाच पुजली आहे. या मार्गावर फक्त दिवसाच नाही तर रात्रीदेखील प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला समोरं जावं लागत आहे. या वाहतूक कोंडीला बरेच काही कारणं आहेत. पण त्या सर्व कारणांमध्ये रस्त्यावरील खड्डे हे प्रमुख कारण आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. विशेष म्हणजे आज तर या वाहतूक कोंडीची हद्दच झाली. कारण मुंबई-नाशिक महामार्गावर माजिवाडा ते माणकोली दरम्यान तब्बल चार ते पाच तास गाड्या अडकून राहिल्या. त्यामुळे वाहनचालकांपासून प्रवाशी प्रचंड वैतागले. या वाहतूक कोंडीच्या समस्येवर प्रशासन, सरकार काही उपाययोजन करतील की नाही? असा प्रश्न या निमित्ताने उभा केला जातोय.
शाळेत झाली भाकरी बनवण्याची स्पर्धा, मुलांना समजले आईचे कष्ट
शाळकरी मुलांमध्ये समानतेची जाणीव व्हावी घरातलं प्रत्येक काम करता यावं या उद्देशाने औरंगाबाद शहरामधील ज्ञानेश विद्यामंदिर शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाकरी थापण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यासाठी लागणारे साहित्य पीठ, चूल, तवा सर्व मुलांना घरून आणण्यास सांगितले होते. स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे आईच्या गोल भाकरीची जाणीव झाल्याची भावना या वेळी आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली.
या अनोख्या स्पर्धेत 45 विद्यार्थी सहभागी झाले होते. या 45 विद्यार्थ्यांमध्ये पाच जणांचा एक ग्रुप तयार करून त्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी सर्वात चांगली भाकर बनवण्याची ही स्पर्धा रंगली होती. भाकरी थापत असताना विद्यार्थ्यांना चूल पेटवताना मोठी कसरत यावेळी करावी लागली. नुकताच पाऊस पडल्यामुळे ओल्या काड्या पेटवताना मुलांना मोठी दमछाक करावी लागली. धूर डोळ्यात गेल्याने अनेकांनी आजी आणि आईच्या आठवणी सांगत एक दुसऱ्यांना धीर देत भाकरी यावेळी थापल्या.
‘उगाच जिंकली 25 कोटींची लॉटरी’; कोट्यधीश होऊनही का पश्चाताप करतोय रिक्षाचालक?
दैनंदिन आयुष्यात अनंत अडचणी असतात. त्यातल्या बहुतांश समस्या पैशांशी निगडित असतात. अशा परिस्थितीत अचानक खूप पैसे मिळाले तर प्रत्येक अडचणीतून सुटका होऊ शकते आणि जगणं सुसह्य होईल, असं वाटायला लागतं; पण पैसा आला म्हणजे जीवन सुखी होईलच असं काही सांगता येत नाही. उलट मनस्ताप वाढून नातेसंबंधात कटुता येण्याची शक्यताही असते. याच बाबीची प्रचिती 25 कोटी रुपयांची लॉटरी जिंकलेल्या केरळच्या ऑटोरिक्षा ड्रायव्हरला येतेय. मोठ्या रकमेची लॉटरी जिंकल्यानंतर अवघ्या पाचच दिवसांत अनूप असं म्हणू लागला आहे, की ‘एवढ्या मोठ्या लॉटरी लागली नसती तरी बरं झालं असतं.’ ‘टीव्ही नाइन हिंदी’ने या संदर्भातलं वृत्त दिलंय.पत्नी, मुलं आणि आईसोबत रिक्षाड्रायव्हर अनूप केरळमध्ये श्रीवराहम इथं राहतात. मुलांची बचत पेटी फोडून अनुप यांनी ओणम बंपर लॉटरीचं तिकीट एका स्थानिक एजंटकडून खरेदी केलं होतं. 25 कोटी रुपयांची लॉटरी लागल्यानं ते व त्यांचे कुटुंबीय आनंदित झाले; पण लॉटरीची एवढी मोठी रक्कम मिळणार असं कळताच त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या. आता त्यांना टाळण्यासाठी अनूप यांना सतत तोंड लपवत फिरावं लागत आहे.
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ला थेट हॉलीवूडमधून पाठिंबा! अभिनेत्यानं ट्विट करत म्हटलं..
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो यात्रे’ला प्रारंभ झाला आहे. ही यात्रा 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे. दररोज 21 किमी चालल्यानंतर, 150 दिवसांत 3 हजार 570 किमी अंतर कापून ही काश्मीरमध्ये पोहोचणार आहे. या यात्रेला आता हळूहूळ पाठींबा मिळताना दिसत आहे. यात्रेच्या अठराव्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो आंदोलनाला थेट हॉलीवूडमधून पाठिंबा मिळाला आहे.जॉन क्यूसैक या हॉलीवुड अभिनेत्याने ट्विट करुन याला पाठिंबा दर्शवला आहे. 56 वर्षीय अभिनेत्याने ट्विटरवर लिहिले की, “भारतीय खासदार राहुल गांधी काश्मीर ते केरळ प्रवास करत आहेत.” त्याच्या ट्विटवर, एका वापरकर्त्याने अभिनेत्याचे आभार मानले ज्याला त्याने उत्तर दिले, ‘होय – एकता – सर्वत्र सर्व फॅसिस्टांविरुद्ध.’ याआधीही या अभिनेत्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याशिवाय त्यांनी नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समर्थनही केले.
पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पीएफआय या संघटनेवर एनआयएने केलेल्या कारवाईविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. “ज्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या त्यांना सोडणार नाही,” असं म्हणत फडणवीसांनी गंभीर इशारा दिला. ते शनिवारी (२४ सप्टेंबर) नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात आणि भारतात कुणी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणार असेल तर त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कारवाई करू. ते जिथं असतील तिथून शोधून काढून कारवाई करू.”
धुळ्यात पाण्याच्या टाकीवर चढून नगरसेवकासह नागरिकांचे आंदोलन
धुळे शहराचा पाणी प्रश्न पुन्हा पेटण्याची चिन्हे आता निर्माण झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक सामाजिक संघटना, पक्ष, धुळेकर नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून अनेक आंदोलन केली. मात्र धुळे मनपा प्रशासन पाण्याच्या संदर्भात अद्यापही योग्य नियोजन करू शकलेली नाही. त्यामुळे आज धुळे मनपाच्या नगरसेवकावर पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्याची वेळ आली आहे.धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे संपूर्ण शहरात पाणीच पाणी झाले असले तरी, मात्र नागरिकांच्या नळाला मात्र कोरड असल्याचे दिसून येत आहे. धुळे महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे मुबलक पाणीसाठा असून देखील शहरात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे शहरातील नगरसेवकासह नागरिकांना पाण्यासाठी थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनं करावी लागत आहेत.
SD Social Media
9850 60 3590