आज दि.९ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…


वर्षभरापासून सुरू असलेले
शेतकरी आंदोलन संपले

गेल्या वर्षभराहून अधिक काळ केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीत शेतकरी आंदोलन करत होते. या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ११ डिसेंबर रोजी आंदोलन संपवून आपल्या घरी परतणार असल्याची घोषणा केली आहे.
केंद्र सरकारने पाठवलेला प्रस्ताव शेतकरी संघटनांनी मान्य केला आहे. सरकारकडून आलेल्या प्रस्तावाबाबत आम्हा सर्वांमध्ये एकमत झाल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. आम्ही मोठ्या विजयासह घरी परत जात असल्याचे किसान मोर्चाने सांगितले. ११ डिसेंबरपासून शेतकरी आपापल्या राज्यात घरी परतणार आहेत.

२० मिनिटांनी हेलिकॉप्टरसोबत
संपर्क तुटला : राजनाथ सिंह

राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचा उड्डाण कालावधी अवघा २७ मिनिटांचा होता. ११ वाजून ४८ मिनिटांनी हेलिकॉप्टरनं एअरबेसवरून उड्डाण घेतलं. हे हेलिकॉप्टर १२ वाजून १५ मिनिटांनी वेलिंग्टन येथे पोहोचणार होतं. पण सुलुल एअरबेसचा १२ वाजून ८ मिनिटांनी अर्थात उड्डाण घेतल्यानंतर २० मिनिटांनी हेलिकॉप्टरसोबत संपर्क तुटला, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

काही बाबतीत राजकारणापासून
दूर राहिले पाहिजे : फडणवीस

काही बाबतीत राजकारणापासून दूर राहिलं पाहिजे. जिथे संरक्षण दलांचे प्रमुख यांचा विषय आहे तिथे अशी वक्तव्यं करण्यापेक्षा, देशाची सर्वोच्च प्राथमिकता अपघात का झाला ही आहे. तिन्ही सैन्यदलांची मिळून समिती तयार करण्यात आली आहे. ती समिती चौकशी करत असून त्याआधी याबद्दल बोलणं अनुचित आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत घटनेची चौकशी व्हावी असे म्हटले आहे.

ओबीसी आरक्षण प्रकरणी
सरकार पुन्हा न्यायालयात

स्थानिक स्वराज्य संस्थामधल्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा तापणार असल्याचं दिसत आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या अध्यादेशाला काही दिवसांपूर्वी स्थगिती दिलेली असताना, आता राज्य सरकार पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. आता १३ डिसेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. ओबीसी आरक्षणावरून देशातील इतर राज्यांना वेगळा आणि महाराष्ट्राला वेगळा नियम का…? असा सवाल उपस्थित करत ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात किंवा सर्वच निवडणुका पुढे ढकला अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

निवडणुका सगळ्याच
एकत्र घ्या : अजित पवार

निवडणुका सगळ्याच एकत्र घ्या किंवा थांबवायच्या असतील तर सर्वच थांबवा या मतावर राज्यसरकार ठाम आहे.”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. चार – पाच राज्यात असाच प्रसंग आला होता त्यावेळी न्यायव्यवस्थेने निकाल वेगळा दिला होता आणि महाराष्ट्रात असा निकाल वेगळा दिला आहे. सांगतानाच राज्यसरकारने ज्याच्यात दुरुस्ती केलेली होती तो कायदा स्थगित केलेला नाही मात्र ओबीसींच्या जागांवरील निवडणूका थांबवल्या आहेत, हे पवार यांनी स्पष्ट केले.

ओमायक्रॉनच्या भीतीमुळे
लसीकरणात वाढ

जगभरात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होतो, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली असली तरी त्याबद्दल अद्याप संशोधन सुरू आहे. मात्र, जेव्हापासून ओमायक्रॉनबद्दल विविध बातम्या येऊ लागल्या आहेत, तेव्हापासून देशात लसीकरणात वाढ झाली आहे. ओमायक्रॉनच्या भीतीमुळे नागरिक लसीकरण केंद्रात जाऊन लस टोचवून घेत आहेत.

गुरुच्या त्रासाला कंटाळून
तृतीय पंथियांचे ठिय्या

मानसिक आणि शारीरीक त्रास देणाऱ्या तृतीय पंथीय गुरुच्या त्रासाला कंटाळून दहा ते पंधरा तृतीय पंथियांनी औरंगाबादच्या तक्रार निवारण केंद्रात ठिय्या मांडत गोंधळ केला. या गोंधळादरम्यान एका तृतीय पंथियाने अंगावर रॉकेल ओतून घेतले. केंद्रात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दामिनी पथकाच्या पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना बुधवारी सिल्लेखाना परिसरात घडली.

शेलार यांना 1 लाखाचा
ऑनटेबल जामीन मंजूर

एका आक्षेपार्ह वक्तव्यावरुन महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यातील वाद आता पोलिस ठाणे आणि न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. पेडणेकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आज आशिष शेलार यांनी जामीनासाठी अर्ज केला. त्यानंतर शेलार यांना 1 लाखाचा ऑनटेबल जामीन मंजूर केला आहे. इतकंच नाही तर शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत महापौरांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे

भाजीपाल्यावरही करपा
रोगाचा प्रादुर्भाव

वातावरणातील बदलामुळे भारतीय कृषी संशोधन संस्थेच्यावतीने पिकांची विशेष काळजी घेण्याचे अवाहान केले आहे. आता भाजीपाल्यावरही याचा परिणाम जाणवू लागल्याने बटाटा आणि टोमॅटोमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे भाजीपाल्याची मुळे मजबूत करण्यासाठी त्याला मातीचे अच्छादन करणे आवश्यक आहे. त्यामुळे पिकाचे संरक्षण होणार आहे. भौतिकशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञांनी बटाटा पिकाकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.


SD social media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.