जागतिक आरोग्य संघटनेची थीम : ‘एक निष्पक्ष, स्वस्थ जगाची निर्मिती’
दरवर्षी 7 एप्रिलला जगभरात जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातोय. याची सुरुवात 1950 साली जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली होती. सन 1948 साली 7 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जावा असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर 1950 पासून हा दिवस साजरा केला जातोय. आज जगभरात 71 वा जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात येतोय.
आरोग्य म्हणजे फक्त रोगांचा अभाव, एवढीच व्याख्या नसुन आरोग्य म्हणजे शारीरिक व मानसिक, सामाजिक स्वास्थ्य असणं होय.
सद्य परिस्थितीत आरोग्यावर खूप मोठं संकट आले आहे.ते म्हणजे कोरोना रूपी संकट. मागील वर्षा पासून ते आजतागायत संपूर्ण विश्वाच्या आरोग्यावर कोरोनाने संकट रूपी विळख्यात घट्ट आवळले आहे.सुरवातीच्या कालावधीमध्ये पुरेशी माहिती,रोगाचे विशेष ज्ञान उपलब्ध नव्हते, आरोग्य यंत्रणा संसाधन नव्हते., कुठलीही लस उपलब्ध नव्हती.तेव्हा पासून कोरोना विरोधात युद्ध पातळीवर काम सुरू आहे.सद्य स्थितीत आरोग्य यंत्रणा सुसज्ज आहे.भारताने लस निर्मिती केली असून ती इतर मित्र राष्ट्रांना पुरेसा पुरवठा करून, कोरोना वर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झाले आहेत.सर्वच स्तरावर मोठ्या प्रमाणात यंत्रणा कार्यरत आहेत पण, वैयक्तिक पातळीवर आपली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने या राष्ट्रीय कार्यात खारीचा वाटा उचलावा असे अपेक्षित आहे.सद्य परिस्थितीत आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.
आजच्या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे जगभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. सुरुवातीला काही मोजक्या देशांत हा दिवस साजरा केला जायचा. आता जगभरातील बहुतांश देशात जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातोय. हा दिवस साजरा करताना दरवर्षी एक खास थीमचे आयोजन करण्यात येतंय.
या वर्षी जागतिक आरोग्य दिवस साजरा करताना ‘एक निष्पक्ष, स्वस्थ जगाची निर्मिती’ ही थीम आहे.
जगावर आज कोरोनाचे संकट आले आहे. अनेक देशात कोरोनामुळे मृत्यू वाढत आहेत. काही मागास देशांत अजूनही कोरोनाचे लसीकरण सुरू झाले नाही. कोरोनाच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लसीकरणात भेदभाव होऊ नये म्हणून मोठं काम केलंय.
गेल्या वर्षभरात व्हाट्सअँप , युट्यूब द्वारा लोकांना शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाले.पण मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नियमित योगासने आणि प्राणायाम याला महत्त्व देणं गरजेचं आहे. योगाभ्यासातील सुर्यनमस्कार,आसने या मुळे शारीरिक लाभ मिळतात तर, प्राणायाम ध्यान ,ओंकार साधनेने श्वसन संस्था अधिक सक्षम होऊन मानसिक स्वास्थ चांगले लाभते.
नियमित योगासने , प्राणायाम, उत्तम दिनचर्या ,सकस आहार, सात्विक विचारआदीं मुळे नक्कीच आरोग्यास फायदा होतो.
तरीही कोरोना सदृश्य लक्षणं जाणवली किंवा साधा ताप , सर्दी खोकला इ.किरकोळ वाटणारी लक्षणं जाणवली तरी लवकरच डॉक्टरांकडे जाऊन चिकित्सा करणे गरजेचं आहे. लवकरात लवकर चाचणी करणे देखील महत्वाचे आहे. लवकर निदान झाल्यास आपण आपल्या परीवाराचे व आपले संरक्षण करु शकतो. प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी करुन नियमित हात धुणे , मास्कचा वापर, फिजीकल डिस्टंसचे पालन करणे व लक्षणं आढळल्यास लवकर चाचणी , निदान व चिकित्सा करून आपण आपलं आरोग्य जपुया. स्वस्थ समाज व स्वस्थ विश्व निर्माण करण्यासाठी कटिबद्ध होऊ.
कोरोना व्यतिरिक्त आजही जगभरातील लाखो लोक अनेक जीवघेण्या आजारांशी झुंजत आहेत. यामध्ये मलेरिया, हैजा, टीबी, पोलिओ, कुष्ठरोग, कॅन्सर आणि एचआयव्ही एड्स यांचा समावेश होतोय. जगभरातील लोकांना सामाजिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वस्थ बनवणे आणि जागरुकता निर्माण करणे हा जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.
जागतिक आरोग्य दिवस साजरा करताना जगभरातील लोकांनी आपल्या आरोग्याची देखभाल करणे तसेच आपल्या आरोग्याविषयी जागरुक राहणे यासाठी प्रयत्न केले जातात. जागतिक आरोग्य संघटनेच्या सोबतच इतर संघटनाही या क्षेत्रात काम करतात, आजच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त संकल्प करुया कि प्रत्येकाचे आयुष्य हे आरोग्यमयी राहो… प्रत्येकाला आरोग्य लाभो ह्याच आरोग्य दिनाच्या आरोग्यमय शुभेच्छा….!
डॉ.सौ.शरयू जितेंद्र विसपुते
बी.ए.एम.एस.,एम.ए. योगा
संचालिका – वरद क्लिनीक, योगा सेंटर, जळगाव.