आक्षी येथील मराठीतील आद्य शिलालेखाची सुयोग्य स्थळी प्रतिष्ठापना आणि परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचे उद्घाटन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज, सोमवारी करण्यात येणार आहे.
आक्षी येथील दोन दुर्लक्षित शिलालेखांचे जतन करण्याची मागणी आक्षी ग्रामपंचायत, इतिहासप्रेमी आणि नागरिकांनी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शिलालेखांच्या जतनासाठी प्रयत्न सुरू केले. तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पुढाकार घेत प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत त्यांचे जतन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या निधीतून शिलालेख आक्षी येथील समुद्रकिनारी असलेल्या साई मंदिर परिसरात प्रतिष्ठापना करून परिसर सुशोभीकरण करण्यात आला आहे.
कर्नाटकमधील श्रवण बेळगोळ येथील बाहुबली गोमटेश्वरांच्या मूर्तीखाली लिहिलेला शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख मानला जातो. तो १११६-१७ च्या दरम्यान कोरला गेला असल्याचे दाखले मिळतात. गंग राजघराण्यातील चामुण्डाराय या मंत्र्याने या गोमटेश्वराची मूर्ती तत्कालीन राणीच्या आग्रहास्तव बनवून घेतली. या मूर्तीखाली एक शिलालेख कोरण्यात आला. त्यात कन्नड, तमिळ आणि मराठी भाषा कोरली. श्री चामुण्डाराये करवियले, गंगाराये सुत्ताले करवियले अशी वाक्ये या शिलालेखावर आढळतात. मात्र, रायगड जिल्ह्यातील आक्षी येथे याहूनही जुना एक शिलालेख आहे. पुरातत्त्व विभागाच्या अनास्थेमुळे हा शिलालेख दुर्लक्षित अवस्थेत पडून होता. ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. श. गो. तुळपुळे यांच्या संशोधनानुसार हा मराठीतील पहिला शिलालेख असल्याचे स्पष्ट झाले. शिलालेखाची निर्मिती शके ९३४ म्हणजे इ. स. १०१२ मध्ये झाल्याचा स्पष्ट उल्लेख या शिलालेखावर आहे.