कोरोनाचा प्रदुर्भाव कमी होत आहे असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आता कोरोनाने डोके वर काढले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यातच कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील शिरकाव केला आहे. देशात ओमिक्रॉनचे देखील रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान बॉलिवूडला देखील कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. अनेक अभिनेते, अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता दिग्गज अभिनेते सत्यराज यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी चेन्नईमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सत्यराज हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी बॉलिवूडसोबतच टॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी बाहुबली चित्रपटामध्ये कटप्पाची भुमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांची कटप्पाची भूमिका विशेष गाजली. त्यांनी आपल्या अभिनयाने चाहात्यांची मने जिंकली. सत्यराज यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी चेन्नईमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार सत्यराज यांना सात जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सत्यराज यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना घरातच क्वॉरंटाईन करण्यात आले होते. मात्र त्यांना त्रास जाणवू लागल्याने सात जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान अद्याप बाहुबलीच्या टीमकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.