पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 28 जानेवारीचा पुणे दौरा अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. देशभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) दौरा रद्द झाल्याची माहिती पुणे जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जानेवारीला पुण्याच्या दौऱ्यावर येणार होते. पुण्यात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची पुणे जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात येत होती. मात्र, गेल्या पंधरा दिवसांमध्ये देशात आणि महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नरेंद्र मोदी पुणे यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रो उद्घाटन, दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या नावाच कलादालन, पुणे महापा पालिकेतील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार होतं. तसेच नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाल्याने मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पुण्यातील विविध विकासकामांची उद्घाटन करण्यात आली होती. भाजपनं अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त मोठं शक्तीप्रदर्शन देखील केलं होतं.
राज्यात कोरोना रुग्णावाढीचा कहर सुरु आहे. राज्यात शनिवारी नव्या 41 हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 2.05 इतका आहे. दरम्यान, 41 हजार 434 नव्या रुग्णांपैकी 20 हजारपेक्षाही जास्त नवे रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. दरम्यान ओमिक्रॉनचे 133 नवे रुग्ण आढळून आले आहेत